बजरंग हरला; आता कास्य पदकासाठी झुंजणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी मल्लांसाठी टोकियो ऑलिम्पिकच्या उत्तरार्धात शुक्रवारचा दिवस निराशेचा ठरला. सुवर्ण पदकाचा प्रबळ दावेदार असलेल्या बजरंग पुनियाला 65 किलो गटाच्या उपांत्य लढतीत अजरबैजानच्या वर्ल्ड चॅम्पियन अलीव हाजीने एकतर्फी लढतीत पराभूत केले. महिला गटात सीमा बिस्ला सलामीलाच गारद झाली. मात्र बजरंग उद्या देशाला कास्य पदक जिंकून देण्यासाठी आखाडय़ात जिवाचे रान करताना दिसणार आहे.

सीमा बिस्लाकडून निराशा

हिंदुस्थानची महिला कुस्तीपटू सीमा बिस्ला हिने 50 किलो गटात सलामीच्याच लढतीत निराशा केली. तिला टय़ुनिशियाच्या सारा हमदी हिने 3-1 गुण फरकाने पराभूत केले. साराने पहिल्या पिरियडमध्ये एक, तर दुसऱया पिरियडमध्ये दोनदा एक-एक असे तीन गुण मिळवले. सीमाला पहिल्या तीन मिनिटांच्या फेरीत एकही गुण मिळवता आला नाही. दुसऱया पिरियडमध्ये एक गुण मिळवत तिने झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र सारापुढे तिचा निभाव लागला नाही.

सलामीच्या लढतीतच झाली होती दमछाक

बजरंग पुनियाला सलामीच्या लढतीत किर्गिस्तानच्या एर्नाजर अकमातालिवे याने झुंजविले. बजरंगने एक वेळ 3-1 अशी आघाडी घेतली होती. मात्र दुसऱया पिरियडमध्ये किर्गिस्तानच्या प्रतिस्पर्ध्याने 3-3 अशी बरोबरी साधली. नशीब बजरंगने एका डावात दोन गुण मिळवले होते म्हणून त्याला विजयी घोषित करण्यात आले. बजरंगने इराणच्या मोर्तेजा घियासीला चितपट करून कुस्तीशौकिनांच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. मात्र उपांत्य फेरीत पराभव झाल्याने बजरंगचे सुवर्ण पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले.

उपांत्य लढतीत अजरबैजानच्या मल्लाकडून पराभव, सीमा बिस्ला सलामीलाच गारद

आवडत्या डावात सापडला बजरंग

पहिला मिनिटाच्या खडाखडीत अलीव हाजीने नकारात्मक खेळ केल्याने 30 सेकंदांत गुण मिळविण्याच्या नियमानुसार पंचांनी बजरंगला एक गुण बहाल केला. मात्र त्यानंतर बजरंग त्याच्या भारंद्वाज या आवडत्या डावात सापडला. अजरबैजानच्या कुस्तीपटूने बजरंगच्या पायांवर ताबा मिळवत त्याला दोनदा फिरवत 4 गुण वसूल केले. दुसऱया पिरियडमध्येही अलीव हाजीचाच दबदबा बघायला मिळाला. त्याने दोन वेळा एकेरी पटात घुसून बजरंगच्या पाठीवर ताबा मिळवत चार गुण मिळवले. पिछाडीवर पडलेल्या हिंदुस्थानी मल्लाने लढतीत परतण्यासाठी चांगली लढत दिली. मात्र त्याला केवळ चारच गुण मिळविता आले. अजरबैजानच्या खेळाडूने बजरंगला दोनदा आखाडय़ाबाहेर ढकलून गुण मिळवले, तर पुन्हा एकेरी पटात घुसून पाठीवर स्वार होऊन दोन गुणांची कमाई करीत ही कुस्ती 12-5 फरकाने जिंकून अंतिम फेरीत धडक दिली.