
हिंदुस्थानची पॅरा टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेल हिने शुक्रवारी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये जबरदस्त कामगिरी करीत इतिहास रचला. भाविनाबेन पटेल हिने जागतिक क्रमवारीत दुसऱया स्थानावर असलेली तसेच गतविजेती बोरीस्लावा रँकोविच हिला 3-0 अशा फरकाने पराभूत करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. याचसोबत टोकियो पॅरालिम्पिकमधील हिंदुस्थानचे पहिले पदक पक्के झाले. पॅरालिम्पिकमधील टेबल टेनिस या खेळात पदक जिंकणारी ती हिंदुस्थानची पहिलीच टेबल टेनिसपटू ठरणार आहे. भाविनाबेन पटेल हिने मेट्रोपॉलिटन जिम्नॅशियम येथे झालेल्या महिला एकेरीच्या (क्लास 4) लढतीत सर्बियाच्या महिला टेबल टेनिसपटूवर दमदार विजय मिळवत आगेकूच केली.
भाविनाबेन पटेल हिने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत बोरीस्लावा रँकोविच हिच्यावर 11-5, 11-6, 11-7 अशा फरकाने अगदी सहज विजय नोंदवला. हिंदुस्थानच्या पॅरा टेबल टेनिसपटूने अवघ्या 18 मिनिटांमध्ये प्रतिस्पर्ध्याला हरवले हे विशेष. दरम्यान, याआधी गुरुवारी झालेल्या लढतीत भाविनाबेन पटेल हिने ब्राझीलच्या जॉएस ओलीव्हीएरा हिच्यावर 12-10, 13-11, 11-6 अशा फरकाने विजय मिळवत पुढे पाऊल टाकले होते.
टेक चंदचे अपयश
टोकियो पॅरालिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात टेक चंदच्या हाती हिंदुस्थानचा झेंडा होता. तो हिंदुस्थानचा ध्वजवाहक होता. मात्र हिंदुस्थानच्या या गोळाफेकपटूला प्रतिष्ठेच्या क्रीडा महोत्सवात आपला ठसा उमटवता आला नाही. त्याने मोसमातील सर्वोत्तम कामगिरी केली. पण टेक चंदला अखेरच्या स्थानावरच समाधान मानावे लागले. पदक मिळवण्याच्या शर्यतीमधून तो बाहेर निघाला.
तिरंदाज राकेशकुमार तिसऱया स्थानावर
हिंदुस्थानचा तिरंदाज राकेश कुमार याने कंपाऊंड रँकिंग राऊंडमध्ये 699 गुणांसह तिसरे स्थान पटकावले. विवेक चिकाराने रिकर्व्हमध्ये 609 गुणांसह दहावे स्थान पटकावले. हरविंदर सिंग रिकर्व्हमध्ये 600 गुणांसह तसेच शाम सुंदर स्वामी कंपाऊंडमध्ये 682 गुणांसह 21 स्थानावर राहिला.
पॉवरलिफ्टर सकीना खातुन पाचव्या स्थानावर
हिंदुस्थानची पॉवरलिफ्टर सकीना खातुन हिला टोकियो पॅरालिम्पिकमध्ये पदकापासून दूरच राहावे लागले. सकीना खातुन हिला महिलांमध्ये 50 किलो वजनी गटात पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. 2014 साली झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये कास्य पदक जिंकलेल्या सकीना खातुन हिने 93 किलो वजन उचलले होते. हीच तिची सर्वोत्तम कामगिरी ठरलीय. चीनच्या डॅण्डन हू हिने 120 किलो वजनासह सुवर्ण पदक पटकावले.




























































