थरारक विजयामुळे जर्मनीचे आव्हान जिवंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | मॉस्को

शनिवारी रात्री खेळल्या गेलेल्या सामन्यात स्वीडनवर थरारक विजय मिळवत जर्मनीने रशियात सुरू असलेल्या फिफा विश्वचषकातील आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. इंजुरी टाईममध्ये शेवटच्या ३० सेकंदात गोल करणारा क्रूझ जर्मनीचा हिरो ठरला.

पहिल्या सामन्यात मेक्सिकोकडून धक्कादायक पराभव सहन करावा लागणाऱ्या जर्मनीला स्वीडनविरुद्धच्या सामन्यात विजय आवश्यक होता. जर्मनीने स्वीडनविरुद्ध अत्यंत आक्रमक सुरुवात केली. पहिल्या १५ मिनिटात जर्मनीने स्वीडनच्या गोलपोस्टवर तुफान हल्ले चढवले, परंतु गोल करण्यात त्यांना अपयश आले. जर्मनीचे आक्रमण थोडे थंड झाल्यावर स्वीडनने संधीचा फायदा उठवत पहिला गोल केला आणि जगज्जेत्या जर्मनीला धक्का दिला. स्वीडनकडून टोइव्हनने ३२ व्या मिनिटाला हा गोल केला. मध्यंतरापर्यंत स्वीडनने ही आघाडी कायम राखली.

मध्यंतरानंतर जर्मनीचा संघ एक वेगळ्याच जोशात मैदानात उतरला. चेंडू सातत्याने स्वीडनच्या हाफमध्ये असल्याने बचाव करणारे खेळाडू सैरभैर झाले. याच संधीचे सोने करत जर्मन खेळाडू रिअसने मैदानी गोल करत संघाला बरोबरी साधून दिली. यानंतर जर्मनीला गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या पण त्यात गोल करण्यात ते अपयशी ठरले. सामना संपण्यास १० मिनिटाचा अवधी असताना जर्मनीचा डिफेंडर बोएटेंगला रेड कार्ड मिळाले. त्यामुळे जर्मनीला शेवटी दहा खेळाडूंसह खेळावे लागले. पण हरतील ते विश्वविजेता कसले. चेंडू शेवटपर्यंत आपल्या ताब्यात ठेवत जर्मन खेळाडू संधी शोधत होते. सामन्यात शेवटी ५ मिनिटांचा इंजुरी टाईम जोडण्यात आला. या ५ मिनिटात जर्मनीला एक गोल हवा होता. ५ मिनिटातील ४ मिनिटं संपली आणि जर्मनीच्या चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू दिसू लागले. पण खेळ अजून बाकी होता. शेवटच्या मिनिटाला जर्मनीला मोक्याच्या ठिकाणावरून फ्री किक मिळाली. या शेवटच्या संधीचा पुरेपूर फायदा उठवत क्रूझने अप्रतिम, अविश्वसनीय गोल केला आणि जर्मन खेळाडू, प्रशिक्षक, चाहत्यांनी मैदानात एकच जल्लोष केला. या विजयामुळे जर्मनीचे विश्वचषकातील आव्हान कायम राहिले असून त्यांचा शेवटचा सामना दुबळ्या दक्षिण कोरियाशी होणार आहे.