
अन्य राज्यातील मासेमारी बोटींद्वारे होणाऱ्या अतिरेकी मासेमारीमुळे महाराष्ट्र, गोव्यातील मत्स्योत्पादनात गेल्या काही वर्षात घट होत असल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. अशी माहिती कोचीन केरळ येथील केंद्रीय समुद्री मत्स्यिकी अनुंसधान संस्थेचे उप संचालक डॉ. के. सुनील मोहम्मद यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
गोवा, महाराष्ट्र, गुजरात हा वरचा झोन व कर्नाटक, केरळ, तामिळनाडू हा खालचा झोन असे स्थान निश्चित करून व सामंजस्याने मासेमारी व्हावी. मासळीची लूट ही धोकादायक आहे. केरळ राज्याच्या धर्तीवर कमी आकाराची मासळी पकडल्यास दंडात्मक कारवाईचा कायदा देशातील किनारपट्टी भागातील सर्व राज्यांमध्ये झाल्यास मत्स्योत्पादनात निश्चितच वाढ होईल. अशीही स्पष्ट भूमिका डॉ. के. सुनील मोहम्मद यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली.
कोचीन येथे नॅशनल फिशवर्कर्स फोरमच्या राष्ट्रीय कार्यकारिणी परिषदेच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमार प्रतिनिधी व पत्रकार प्रतिनिधींनी कोचीन येथील केंद्रीय समुद्री मात्स्यिकी अनुसंधान संस्थेस भेट दिली. देशाच्या समुद्रात आढळणार्या विविध मासळीं प्रजाती, जैवविविधता, कोरल-प्रवाळ या संग्रहालयाची पाहणी करत माहिती घेतली.
यावेळी ज्येष्ठ मच्छीमार नेते रमेश धुरी, छोटू सावजी, दिलीप घारे, नारायण कुबल, बाबी जोगी, धर्माजी आडकर, कुणाल मांजरेकर, महेश कदम, भूषण मेतर आपा मालंडकर, समीर म्हाडगूत उपस्थित होते.
यावेळी विविध राज्यातील मासेमारीच्या समस्या व उपाय यावर डॉ. मोहम्मद यांनी मार्गदर्शन करत विविध विषयावर चर्चा केली. संस्थेच्यावतीने दरवर्षी देशाच्या किनारपट्टी भागातील मत्स्योत्पादनाची त्या त्या राज्यात माहिती घेण्यात येत आहे. यात गेल्या काही वर्षात महाराष्ट्र, गोव्यातील मत्स्योत्पादनात मोठी घट झाली असल्याचे दिसून आले आहे. याउलट गुजरात, कर्नाटक, केरळ या राज्यातील मत्स्योत्पादनात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. याचे कारण बघितले गेल्यास यात तिन्ही राज्यातील मच्छीमार महाराष्ट्रातील सागरी हद्दीत जाऊन मासेमारी करत आहेत असे चित्र आहे.
समुद्रतळाशी एलईडी दिवे सोडून केली जाणारी मासेमारी ही धोकादायक असून त्यावर कडक कारवाई व्हायलाच हवी असे डॉ. मोहम्मद यांनी स्पष्ट केले. छोटी मासळी पकडली जाऊ नये यासाठी जाळ्यांच्या आसाचा योग्य आकार असावा यासाठी कायदा व्हायला हवा. विविध राज्यातील बंदरांमधील नौकांची संख्या पाहता त्यात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. सर्वसाधारणपणे नौकांचे आयुष्य हे वीस वर्षाचे असते. त्यामुळे अशा जुन्या नौका नष्ट करणे आवश्यक आहे. नौकांची संख्या वाढल्यास मासेमारीच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील विविध बंदरातील नौकांची संख्या वाढणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.
मत्स्योत्पादनात घट हा चिंतेचा विषय आहे. पावसाळी मासेमारी कालावधी जास्त असायला हवा. तसाच तो मासे प्रजनन काळ पाहून निश्चित असावा. मात्र किनारपट्टी भागातील मच्छीमारांचे उदरनिर्वाहाचे साधन मासेमारी असल्याने हा कालावधी वाढविणे शक्य होत नाही. मात्र घटते मत्स्य उत्पादन पाहता मासेमारी बंदी कालावधीसाठी कोणता योग्य. हे निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने समिती स्थापन केली आहे. लवकरच समिती अहवाल सादर करेल.
वादळांचा एक चांगला परिणामही
गेल्या काही वर्षात पश्चिम किनाऱ्यावर समुद्री वादळाची संख्या वाढली आहे. समुद्रातंर्गत वादळाचा किनारपट्टीस व मासेमारीवर धोका निर्माण होत असला तरी वादळामुळे समुद्रातील घुसळण्याच्या प्रक्रियेमुळे मासळीला आवश्यक असलेले खाद्य मोठ्या प्रमाणात मिळत असल्याचे दिसून आले आहे. एकूणच भविष्याच्या दृष्टीकोनातून मत्स्योत्पादनात वाढ करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रत्येक राज्यात कडक कायदे व त्याची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे मतही डॉ. मोहम्मद यांनी व्यक्त केले.सर्वसाधारणपणे नौकांचे आयुष्य हे वीस वर्षाचे असते. त्यामुळे अशा जुन्या नौका नष्ट करणे आवश्यक आहे. नौकांची संख्या वाढल्यास मासेमारीच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील विविध बंदरातील नौकांची संख्या वाढणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.
मत्स्योत्पादनात घट हा चिंतेचा विषय आहे. पावसाळी मासेमारी कालावधी जास्त असायला हवा. तसाच तो मासे प्रजनन काळ पाहून निश्चित असावा. मात्र किनारपट्टी भागातील मच्छीमारांचे उदरनिर्वाहाचे साधन मासेमारी असल्याने हा कालावधी वाढविणे शक्य होत नाही. मात्र घटते मत्स्य उत्पादन पाहता मासेमारी बंदी कालावधीसाठी कोणता योग्य. हे निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने समिती स्थापन केली आहे. लवकरच समिती अहवाल सादर करेल.
मत्स्योत्पादनात वाढ होण्यासाठी गाव, तालुका, जिल्हा स्तरावर कौन्सिलची स्थापना करणे अत्यावश्यक आहे. जेणेकरून त्या त्या भागात मासेमारीसाठी आवश्यक निर्बंध घालणे सोयीचे ठरेल. त्यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत.
































































