बोटावर बसवता येणार टूथब्रश, नववीत शिकणाऱ्या ध्रुवीने तयार केला हर्बल पेपर ब्रश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनेकदा प्रवासादरम्यान दात घासण्यामध्ये अडचण येते. अशा वेळी ‘पेपर सोप’सारखा एखादा पेपर टूथब्रश असता तर किती बरं होईल, असं वाटतं. आपल्या देशातील एका मुलीने असाच एक हर्बल पेपर टूथब्रश तयार केलाय. हा टूथब्रश अगदी एका पेपरसारखा बोटावर बसवता येईल. त्याच्यामुळे पाण्याची बचतही होईल, तर पर्यावरणाची हानीही होणार नाही. गाझियाबादच्या नववीत शिकणाऱया ध्रुवी गुप्ता हिने हा नावीन्यपूर्ण ब्रश विकसित केला असून त्याला पेटंटही मिळाले आहे. लवकरच हा खास ब्रश बाजारात येणार आहे.

ध्रुवीने तयार केलेल्या हर्बल पेपर ब्रशमुळे अगदी थोडय़ा पाण्यात दात स्वच्छ करता येतील. पेपर ब्रश बोटावर घेऊन दात घासता येतील. वनस्पतीपासून निर्माण होणाऱया कागदापासून हा ब्रश तयार करण्यात आला आहे. त्यामुळे त्याची किंमत खूपच कमी असेल. अगदी पर्स किंवा पाकिटातही तो सुरक्षितरीत्या ठेवता येईल.

प्रवासात तोंड धुण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाही अशा वेळी ब्रश उपयुक्त ठरेल. ब्रशला टोकदार दात नसल्याने हिरडय़ांना कोणतीही दुखापत होणार नाही, हिरडय़ांतून रक्त येणार नाही, असे ध्रुवीने सांगितले. पेपर ब्रशसाठी आयसिंग शुगर, मीठ, बेकिंग सोडा, पेपरमिंट, दालचिनी आणि लवंग यांची पेस्ट वापरली आहे.

दोन वर्षांपासून प्रयत्न

ध्रुवी म्हणाली, मी सातवीत असताना एकदा ट्रेन प्रवासात माझ्या हातून ब्रश पडला आणि कपडय़ांवर टूथपेस्ट पडली. त्या वेळी माझ्यातील संशोधक जागा झाला. पेपर साबणासारखा पेपर ब्रश का असू नये, असा विचार मनात आला. त्यानंतर गेली दोन वर्षे मी या विषयाचा अभ्यास केला.

पेटंटही मिळाले…

ध्रुवीच्या हर्बल पेपर ब्रशच्या संशोधनाला कौन्सिल फॉर सायंटिफिक ऍण्ड इंडस्ट्रीयल रिसर्च (सीएसआयआर) तसेच इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टॉक्सिकोलॉजी रिसर्च (आयआयटीआर) यांच्याकडून पुरस्कार मिळाले आहेत. तसेच केंद्र सरकारचे डिझाईन पेटंटही मिळाले आहे. त्यामुळे लवकरच हा नावीन्यपूर्ण ब्रश बाजारात उपलब्ध होणार आहे.