
सामना ऑनलाईन | लंडन
रोमानियाची जागतिक अग्रमानांकित सिमोना हॅलेपला आज विम्बल्डन महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत तैवानच्या बिगरमानांकीत हिएह सु-वेई कडून ३-६ ,६-४, ७-५ असा पराभवाचा धक्का बसला. या हंगामात फ्रेंच ओपन जिकणारी हॅलेप यंदाच्या विम्बल्डनमध्ये बिगरमानांकीत टेनिसपटूकडून पराभव पत्करणारी पहिली महिला खेळाडू ठरली. याआधी १० वर्षांपूर्वी अना इवानोविकला चीनच्या बिगर मानांकित झेन्ग जियेकडून पराभवाचा झटका बसला होता. सु-वेईने यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्येही उच्च मानांकित गर्बिन मुगुरूझाला पराभूत करण्याचा पराक्रम केला होता.
२ तास २० मिनिटाच्या प्रदीर्घ लढतीत हॅलेप आज दुसऱ्या सेटपासून गोंधळलेली दिसली. तिने पहिला सेट ६-३ असा सहज जिंकला. पण नंतर मात्र ”जायन्ट किलर” सु-वेईने बाजी मारत पुढच्या दोन्ही सेट्ससह लढत जिंकत महिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. सु-वेईची पुढची लढत आता स्लोवाकियाच्या डोमिनिका सिबूलकोवाशी होणार आहे.
























































