
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाला 40-40 लाखांचे बक्षीस असलेल्या दोन नक्षली कमांडरना ठार करण्यात यश आले आहे. महाराष्ट्राच्या सीमेजवळ असलेल्या अुभझमाड जंगलामध्ये चकमक झाली आणि या चकमकीत 63 वर्षीय राजू दादा उर्फ कट्टा रामचंद्र रेड्डी आणि 67 वर्षीय कोसा दादा उर्फ कादरी सत्यनारायण यांचा खात्मा करण्यात आला आहे. हे दोन्ही नक्षली कमांडर बंदी घालण्यात आलेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या (माओवादी) केंद्रीय समितीचे सदस्य होते.
महाराष्ट्र सीमेजवळ असलेल्या अभुझमाड जंगलात ही चकमक झाल्याची माहिती नारायणपूरचे पोलीस अधिक्षक रॉबिन्सन गुरिया यांनी दिली. नक्षली कमांडर राजू दादा आणि कोसा दादा हे तेलंगणाच्या करीमनगरचे रहिवासी होते. गेल्या तीन दशकांपासून ‘दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी’च्या कार्यात ते सहभागी होते. त्यांनी बस्तर प्रदेशात अनेक हल्ले केले असून ज्यात सुरक्षा दलातील अनेक कर्मचारी आणि सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला होता. याच दरम्यान सुरक्ष दलांना या भागात नक्षली कमांडरच्या हालचालींबद्दल माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने कारवाई करण्यात आली. आज (22 सप्टेंबर 2025) पहाटे महाराष्ट्राच्या सीमेजवळ अभुझमाड जंगलात दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. काही तास ही चकमक सुरू होती. अखेर दोघांनाही कंठस्नान घालण्यात आलं आणि त्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती पोलीस अधिक्षक रॉबिन्सन गुरिया यांनी दिली.
सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन नक्षली कमांडर ठार झालेच. पण त्याचबरोबर नक्षलवाद्यांची काही हत्यारे जप्त केली आहेत. यामद्ये AK-47 रायफल, एक INSAS रायफल, एक बॅरेल ग्रेनेड लॉंचर, नक्षली साहित्या आणि मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा समावेश होता.