भोसले क्रिकेट अकादमीला विजेतेपद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन आयोजित टोटल कप या 12 वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत भोसले क्रिकेट अकादमी संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत त्यांनी हिंदकला क्रिकेट क्लबवर 18 धावांनी विजय मिळवत चषकावर आपले नाव कोरले. तीर्थ वनारसे (49 धावा) हा त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला. विजेत्यांना हिंदुस्थानचे माजी कर्णधार आणि राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर, मुंबईच्या रणजी निवड समितीचे संजय पाटील आणि महाराष्ट्र राज्याचे क्रीडा संचालक मोटे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी बोलताना वेंगसरकर यांनी छोटय़ा खेळाडूंना आणि त्याचबरोबर त्यांच्या पालकांना कळकळीने सांगितले की, तुम्ही ज्या क्लबसाठी खेळता त्यांच्याशी एकनिष्ठ राहा. कारण हल्ली पालकच मुलांना आज हा क्लब, उद्या दुसराच क्लब असे उपद्व्याप करीत असतात. पण तुम्ही जर आपल्या कामगिरीत सातत्य राखलेत आणि आपली कामगिरी उंचावत नेलीत तर निवड समितीला तुमच्या नावाची दखल घ्यावीच लागेल. त्यामुळे वारंवार क्लब बदलत राहण्यापेक्षा आपली कामगिरी सुधारण्यासाठी कठोर मेहनत करा असा सल्ला त्यांनी मुलांना दिला.

मुंबईच्या रणजी निवड समितीचे सदस्य संजय पाटील यांनी यावेळी बोलताना वेंगसरकर यांच्या कार्याचा आवर्जून उल्लेख केला. आज हिंदुस्थानात केवळ वेंगसरकर हेच छोटय़ा खेळाडूंच्या भवितव्यासाठी झटताना दिसत आहेत आणि त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. तुम्हाला जी संधी त्यांनी उपलब्ध करून दिली आहे त्याचा पुरेपूर लाभ उठवून मुंबई आणि पर्यायाने हिंदुस्थानी संघात स्थान मिळविण्यासाठी त्याचा वापर करा असे पाटील यांनी आवर्जून सांगितले.