
>> आशुतोष बापट
संगमेश्वराच्या डोंगरावर ऐन झाडीत दडलेलं सप्तेश्वराचं मंदिर आवर्जून पाहण्यासारखं आहे. निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या या मंदिराचं प्राचीन जलव्यवस्थापन आणि या रमणीय परिसरात मिळणारी शांततेची अनुभूती घेण्यासाठी कोकणात दडलेला हा खजिना आवर्जून पाहायला हवा.
मुंबई-गोवा महामार्गावर शास्त्र्ााr नदीवरील पूल ओलांडून आपण संगमेश्वरकडे जातो. डावीकडे रस्ता कसबा संगमेश्वरला जातो. तिकडे न वळता संगमेश्वरकडे जायचे. जरा पुढे गेल्यावर उजवीकडे मुळ्ये हॉस्पिटल आहे आणि त्याच्याच समोर डोंगरावर रस्ता चढलेला दिसतो. काही ठिकाणी डांबरी सडक तर काही ठिकाणी मातीचा रस्ता आहे. त्या रस्त्याला चांगलाच चढ आहे. डोंगरावर चढणारा रस्ता सागाच्या जंगलातून जातो. महामार्गापासून अंदाजे 3 कि.मी. गेल्यावर ओढय़ावर एक पूल आहे. इथे रस्त्याला दोन फाटे फुटतात. उजवीकडे ऐन गर्द झाडीत आहे सप्तेश्वर महादेवाचे मंदिर. डावीकडचा रस्ता देवपाट वस्तीकडे जातो. काही अंतर चालत गेल्यावर भक्कम बांधणीचे मंदिर दिसते. मंदिराच्या बाजूनेच पाण्याचा प्रवाह वाहतो आहे.
मंदिराच्या आवाराला भिंत बांधून बंदिस्त केलेले आहे. आपल्या समोर एक पाण्याची एकामागे एक अशी दोन कुंडं दिसतात. त्या कुंडांच्या मागे चिऱयाच्या दगडात बांधलेले सुंदर बांधकाम नजर खिळवून ठेवते. दोन बाजूला खोलीसारखे बांधकाम आणि मधल्या बांधकामाला 5 खिडक्या. या बांधकामात चुन्याचा वापर केलेला आहे. चुन्याच्या घाणीचे दगडी चाक आजही तिथे दिसते. अलकनंदा नदीचा उगम इथेच डोंगरावर होतो. त्याचे खाली येणारे पाणी इथे सात प्रवाहात विभागून ते परत मोठय़ा कुंडात सोडले जाते. सात प्रवाहांचा स्वामी तो ‘सप्तेश्वर’ अशी साधी सोपी व्याख्या. बाजूच्या दोन खोल्यांचे प्रयोजन समजत नाही. त्यांच्या डोक्यावर शिखरासारखे साधे बांधकाम केलेले आहे. पण याच्या पाठीमागे जाऊन पाहिले तर डोंगरावरून आलेला प्रवाह विशिष्ट चॅनेलमधून आणला आहे. प्रत्येक खिडकीपाशी त्याला ‘टी सेक्शन’सारखे बांधकाम करून प्रवाहित केलेला आहे. जिथे तो जोडलेला आहे तिथे एक चौकोनी खड्डा केलेला आहे. अतिशय सुबक आणि उत्तम तंत्रज्ञान वापरून हे जलव्यवस्थापन केलेलं दिसतं. या सर्व सातही खिडक्या आतून एकमेकांना सलग जोडलेल्या आहेत.
त्यांच्या कमानी एका रेषेत सरळ दिसतात. या सगळय़ा स्थापत्यावर इस्लामिक स्थापत्य कलेचा प्रभाव प्रकर्षाने जाणवतो. मध्ययुगीन काळात हे जलव्यवस्थापन केलेलं आहे. शिवाय हे सगळे बांधकाम देखणेसुद्धा केलेले आहे. समोरच्या बाजूला प्रत्येक खिडकीच्या वर व्यालासारखा एक काल्पनिक पशु कोरलेला दिसतो. त्याशिवाय पानाफुलांची सजावट केलेली दिसते. बाजूला आणि डोक्यावर लहान-लहान कोनाडे केलेले आहेत. कदाचित तिथे उजेडासाठी पणत्या ठेवत असावेत. या सातही विभागांतून वाहणारे सगळे प्रवाह पुढच्या बाजूला एकत्र येऊन एका गोमुखातून मोठय़ा कुंडात पडतात. कुंड तरी किती मोठे. 30 फुट लांबी रुंदीच्या कुंडात आत उतरायला पायऱया केलेल्या आहेत. स्वच्छ आणि नितळ असे हे पाणी इथून जमिनीखालून दुसऱया कुंडात जाते. आणि ते कुंड भरले की तिथून पुढे एका ओढय़ाला जाऊन मिळते. हाच ओढा पुढे गावात जातो.
सप्तेश्वर शिवमंदिर पश्चिमाभिमुख आहे. ऐसपैस सभामंडप आणि मोठा गाभारा असे याचे स्वरूप. गाभाऱयाच्या दरवाजावर गणपतीची सुंदर मूर्ती. मंदिराला लागूनच वैजनाथाचे एक छोटेसे मंदिर बांधलेले आहे. हा सगळा परिसर अतिशय शांत आणि रमणीय आहे. अव्याहत वाहणाऱया महामार्गाजवळ डोंगरावर इतके रम्य ठिकाण असेल असे चुकूनही वाटत नाही. इथून आजूबाजूचा मोठा परिसर दृष्टीक्षेपात येतो. पूर्वेकडे सह्याद्रीची मुख्य रांग, आणि खाली दरीत कसबा संगमेश्वर परिसर, तिथली मंदिरे, मुख्यत्वे करून काळभैरव मंदिर आणि तिथे जाणारा रस्ता हे सगळे फार सुंदर दिसते. आंबा, साग, ऐन, शिवण, फणस अशा वृक्षांची दाटी असलेला हा परिसर फारच सुंदर आहे. इथून खरोखरच पाय निघत नाही.
कर्णराजाच्या पदरी असलेल्या कविराज शेषाने ‘संगमेश्वर महात्म्य’ हा ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथात तो संगमेश्वर परिसराचे महात्म्य आणि तिथल्या ठिकाणांचे वर्णन करतो. त्यात त्याने सप्तेश्वराचा उल्लेख केलेला आहे. तसेच परिसरात कुठली कुठली देवळे आहेत याचे वर्णन संगमेश्वर महात्म्यात शेषाने दिलेले आहे. या ग्रंथात कविराज या स्थानाचे श्रेष्ठत्व वर्णन करतो. त्या ग्रंथात कर्णेश्वर मंदिराच्या देखभालीसाठी नेमून दिलेल्या गावांची नावे येतात. त्यात धर्मपूर (आजचे धामापूर), शिवनी (शिवने), धमणी (धामणी), लवल (लोवले), तुर्वरी (तिवरे) अशी गावे दिसतात.
सप्तेश्वरपासून वाहणारी अलकनंदा आणि वरुणा या नद्यांच्या संगमावर कसबा इथे कर्णेश्वराचे शिल्पसमृद्ध शिवालय उभे आहे. दगडी बांधणीचे हे शिवालय आणि त्यात असलेली शिल्पकला बघण्यासारखी आहे. निसर्गाचा वरदहस्त लाभलेले हे नितांत रमणीय ठिकाण संगमेश्वराच्या डोंगरावर ऐन झाडीत दडलेले आहे. इतक्या उंचावर मुद्दाम निर्माण केलेले प्राचीन जलव्यवस्थापन आणि या रमणीय परिसरात मिळणारी शांततेची अनुभूती घेण्यासाठी कोकणात दडलेला हा खजिना आवर्जून पाहायला हवा.





























































