पर्यटकांच्या आगमनाने दापोलीतील समुद्रकिनारे फुलले; व्यावसायिक सुखावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दापोली तालुक्यातील केळशी ते दाभोळ या भागात मोठया प्रमाणात पर्यटक आल्याने येथील सर्वच समुद्रकिनारे फुलले आहेत. त्यामुळे गेले दोन वर्ष बंद असलेल्या पर्यटन व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत. तब्बल दोन वर्षाच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर पुन्हा एकदा पर्यटन व्यवसायाला चांगले दिवस आल्याने पर्यटक व्यवसायिक सुखावले आहेत.

कोरोना महामारीच्या वाढत्या संसर्गामुळे केंद्र शासनासह राज्य शासनाने लॉकडाऊन जारी केला होता. त्यामुळे राज्यातील सर्वच व्यवहार ठप्प पडले होते. सध्या राज्य शासनाने काही प्रमाणात अनलॉकला सुरुवात केल्याने हळूहळू सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू झाले आहेत. त्यात पर्यटन व्यवसायही सुरू करण्यात आल्याने गेली दोन वर्ष घरातच बसून काढावी लागल्याने मनावरचा शिण घालविण्यासाठी निवांतपणाच्या उसंतीकरिता पर्यटकांची पावले पर्यटनासाठी कोकणातील समुद्र किनाऱ्यांकडे वळली आहेत. त्यामुळे गेले दोन वर्ष बंद असलेला पर्यटन व्यवसाय पुन्हा सुरू झाला असून पर्यटकांच्या आगमनाने येथील पर्यटन व्यवसायिक सुखावले आहेत.

दापोली तालूक्यातील केळशी, उटंबर, आडे, पाडले, आंजर्ले, पाजपंढरी, हर्णे, पाळंदे, सालदुरे, मुरूड, कर्दे, लाडघर, बुरोंडी, आपतडी, कोळथरे, भिवबंदर, दाभोळ आदी गावांना समुद्र किनाऱ्ंयाची देणगी लाभली आहे. या समुद्रकिनारी अनेकांनी पर्यटन व्यवसाय सुरू केला आहे. कोरोनाच्या प्रसारामुळे गेले दोन वर्ष या समुद्रकिनारी भागातील व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे पर्यटन व्यवसायिकांसह त्यावर आधारीत सर्व व्यवसाय हे ठप्प पडले होते. आता राज्य शासनाने काही प्रमाणात का होईना पर्यटन व्यवसाय सुरू करण्यास अनुमती दिल्याने पर्यटकांची पावले दापोलीतील समुद्र किनाऱ्यांकडे वळली आहेत.

दापोली तालूक्यातील केळशी ते दाभोळ या भागातील जवळपास सर्वच समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले आहेत. या समुद्र किनारी भागात असलेली पर्यटक संकुळे, पर्यटन विकास महामंडळाचे न्याहारी निवास योजना परवानाधारक आणि हॉटेल सुरू झाल्याने त्यांचा दसऱ्याच्या शुभारंभालाच बऱ्यापैकी व्यवसाय झाला आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी पर्यटक या भागात येतील, अशी शक्यता आहे.