अ‍ॅम्युझमेंट पार्कमध्ये राईड कोसळली, 23 जण जखमी; तिघांची प्रकृती गंभीर

अ‍ॅम्युझमेंट पार्कमध्ये चालू राईड कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 23 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही.

सौदी अरेबियातील तैफमधील ग्रीन माउंटन पार्कमध्ये गुरुवारी ही घटना घडली. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलर झाला आहे. ‘360 डिग्री’ राईडचा मध्यवर्ती खांब तुटल्याने हा अपघात झाला. घटनेच्या वेळी अनेक पर्यटक राईडचा आनंद घेत होते.

राईड कोसळताना दोन ते तीन जण काही मीटर अंतरावर फेकले गेले. तर आत बसलेले अन्य लोक जखमी झाले. अपघात नेमका कसा घडला याबाबत तपास सुरू आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.