महाबळेश्वरातील वाहतूककोंडीत पर्यटक अडकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

नाताळ, नववर्षाचे स्वागत आणि सलग सुट्टय़ांमुळे पर्यटकांनी केलेल्या तुफान गर्दीमुळे महाबळेश्वर, पाचगणी फुल झाले आहे. गिरीस्थळावर सर्वत्र वाहतूककोंडी झाली असून, पर्यटक अडकून पडले आहे. वाहतूककोंडी फोडण्यासाठी रात्री उशिरापर्यंत पोलिसांचे प्रयत्न सुरू होते. वाहतूककोंडीचा मोठा फटका महिला आणि लहान मुलांना बसल्याचे दिसून आले.

महाबळेश्वर, पाचगणी येथील थंड अल्हाददायक वातावरणाची मजा लुटण्यासाठी देशभरातून मोठय़ा संख्येने पर्यटक महाबळेश्वरला दाखल झाले आहेत. पर्यटकांच्या वाहनांमुळे येथील अरुंद रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात वाहतूककोंडी झाली आहे. यामुळे अनेक पर्यटक वाहनांमध्येच अडकून पडले आहेत. पाचगणी, महाबळेश्वरच्या बाजारपेठांमध्ये गर्दी झाली असून, या परिसरात हलक्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पर्यटक मिळेल तेथे गाडी पार्क करत आहेत. मोठय़ा संख्येने वाहने आल्याने पर्यटनाची मजा घेण्यात अडचण येत आहे.

पसरणी घाट दीड तास बंद

वाई-पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात दुपारी दीड तास वाहतूक बंद होती. अनेक वाहने बंद पडल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. पाचगणी व वाईपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पाचगणी व महाबळेश्वरकडे येणाऱया पर्यटकांची संख्या मोठी आहे. दुपारी दीड वाजता हॅरीसन फॉलीपासून जवळच असलेल्या एका वळणावर शैक्षणिक सहल घेऊन महाबळेश्वरकडे निघालेली आरामबस बंद पडली. त्यामुळे वाई व पाचगणीच्या दिशेने जाणारी वाहने जागेवरच थांबली. दोन्ही बाजूला सुमारे चार किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांची रांग लागली होती.