
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सकाळी एअर इंडियाचे विमान ओढून नेणाऱ्या ‘टो-व्हिकल’ वाहनाला अचानक आग लागल्याची घटना घडली. विमानापासून काही अंतरावरच हे वाहन होते. अग्निशमन जवानांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आल्याने पुढील दुर्घटना टळली. जे विमान ओढून नेले जात होते त्यात 85 प्रवासी होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सकाळी 11च्या सुमारास ही दुर्घटना घडली. मुंबईहून जामनगरला जाणाऱ्या एअर इंडियाच्या ‘एआय-647’ या विमानाला ओढून नेणाऱ्या वाहनाला ही आग लागली. टोइंगचा लोखंडी बार विमानाला जोडला जात असतानाच ही आग लागली. आगीच्या ज्वाळा पसरल्याने विमानतळावरील सुरक्षा कर्मचारी तातडीने ऍलर्ट झाले. सुमारे दहा मिनिटे आगीच्या ज्वाळा भडकत होत्या. अग्निशमन जवानांनी आग आटोक्यात आणली मात्र टो-व्हिकल वाहनाचे मोठे नुकसान झाले. आगीच्या या घटनेमुळे जामनगरला जाणाऱ्या विमानाच्या उड्डाणाला 20 मिनिटे उशीर झाला.



























































