
खड्डेमय रस्ते आणि वाहतूककोंडीमुळे त्रासलेल्या वाहनचालकांना आता टोईंग धाडीचाही सामना करावा लागत आहे. वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी ठाण्यात वाहतूक पोलिसांनी आजपासून वागळेत ‘टोईंग टोईंग’ सुरू केले आहे. दरम्यान, ठाणेकर नागरिकांचा विरोध झुगारून वाहतूक पोलिसांनी पुन्हा वाहनांची उचलेगिरी सुरू केल्याने वाहतुकीला शिस्त लागणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली ठाणे शहर वाहतूक शाखेची उचलेगिरी पुन्हा सुरू झाली आहे. टोईंगचा श्रीगणेशा भिवंडी, कल्याण, डोंबिवली, मुंब्यामध्ये सुरू करण्यात आल्यानंतर आता ठाणे शहरातदेखील टोईंग धाडी सुरू झाल्या आहेत. दरम्यान, अपेक्षित बदल करून तसेच तक्रारींच्या अनुषंगाने पारदर्शक योजना तयार केल्यानंतरच टोईंग सुरू करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी आश्वासन दिले होते. मात्र त्यांच्या आश्वासनाला प्रशासनाने हरताळ फासल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.
ठाणे वाहतूक शाखेच्या वागळे इस्टेट परिमंडळात आजपासून टोईंग सुरू करण्यात आली आहे. या भागातील नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या. अनेक ठिकाणी नो पार्किंग बोर्ड असलेल्या ठिकाणी वाहने लावणे, खासगी कंपनीच्या गेटसमोर बेकायदा पार्किंग करणे, सर्व्हिस रोड कब्जा करणे अशा प्रकारच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे या भागात वाहनचालकांना शिस्तीचे धडे देण्यात आले.
पंकज शिरसाठ
(उपायुक्त, ठाणे वाहतूक पोलीस)