जालन्यात मराठा आरक्षणासाठी 600 ट्रॅक्टर तहसील कार्यालयावर

आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, उठ मराठा जागा हो आरक्षणाचा धागा हो अशा गगनभेदी घोषणांनी जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील केदारखेडा गावाचा परिसर आज दणाणून गेला. मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावरून आज मराठा आंदोलकांनी तब्बल 600 ट्रॅक्टर घेऊन तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

सकल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी जालन्यातील केदारखेडा गावासह पूर्णा नदीकाठच्या परिसरातील जवळपास 100 हून अधिक गावांतील मराठा शेतकरी बांधवांनी मोर्चात सहभाग घेतला.

ताकद वाया जाऊ देणार नाही

आंदोलकांशी मनोज जरांगे पाटील यांनी फोनवरून संवाद साधला. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, तुमची ताकद वाया जाऊ देणार नाही असे ते म्हणाले. भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते महात्मा फुले चौकापासून परत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या पायथ्याशी येऊन मोर्चा थांबला.