
गणेशोत्सव हा कोकणातला मोठा सण.घरोघरी गणपतीबाप्पाचे वाजत-गाजत आगमन होते. गणपतीसाठी आकर्षक आरास, सजावट केली जाते. त्यासाठी मखर बनवले जाते. आजकाल रेडीमेड मखर आणण्याकडे अनेकांचा कल असला तरी अजूनही गावागावात घरातील मंडळी एकत्र येऊन मखर बनवतात. गणेशोत्सवात पौराणिक देखावेही उभारण्याची परंपरा अजूनही जपली जात आहे.
गणेशोत्सवात देखावे उभारण्याची परंपरा पूर्वीपासून सुरू आहे. आजकाल गणेश सजावट स्पर्धामुळे हे देखावे सर्वांसमोर येत आहेत. गोकुळअष्टमीनंतर गणेशोत्सवाच्या तयारीला सुरूवात होते. घरातील सर्व मंडळी एकत्र येतात आणि यंदा काय देखावा उभारायचा यावर चर्चा करून निर्णय घेतात.खरतरं मोजकेच दिवस हातात असतानाही रात्रभर जागरण करून देखावे उभारले जातात. देखाव्यांसाठी खास पडदे रंगवले जातात. पौराणिक देखावेही आवडीने साकारले जातात.एखादी पौराणिक कथा निवडून ती देखाव्यातून मांडली जाते.काही देखाव्यातून सामाजिक संदेश दिला जातो. विशेष म्हणजे हे देखावे पर्यावरणपूरक बनवले जातात. कुठेही प्लास्टिक किंवा थर्माकॉलचा वापर होत नाही.
पौराणिक देखाव्यामुळे घरातील एक खोली व्यापून जाते.देखाव्यात प्रकाशझोतांचा योग्य उपयोग करून ते देखावे अधिक आकर्षक केले जातात.रत्नागिरी तालुक्यातील भाटीमिऱ्या येथीम ओंकार कांबळे यांच्याघरी दरवर्षी पौराणिक देखावे उभारले जातात.अनेक गणेश सजावट स्पर्धेत त्यांनी पारितोषिके पटकावली आहेत.यंदाही त्यांनी महाशिवरात्रीचे माहात्म्य हा देखावा उभारला आहे.हा देखावा पहाण्यासाठी नागरिक त्यांच्याघरी गर्दी करत आहेत.



























































