
सामना प्रतिनिधी । मुंबई
अंधेरी पुलाचा भाग कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर सलग दोन दिवस कोसळत असलेला पाऊस पाहून रेल्वेने शनिवारी वांद्रे व वसई येथील पूल बंद केल्यानंतर रविवारी घाटकोपर येथील उड्डाणपुलाला तडा गेल्याने तोही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला, तर मालाड येथील स्कायवॉक खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारी रात्रीपासून बंद करण्यात आला आहे. त्यातच पावसाने उपनगरीय लोकल सेवेलाही फटका बसला. मध्य, पश्चिम व हार्बरच्या लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या.
अंधेरी पूल दुर्घटनेनंतर एकीकडे पुलांचे सुरक्षा ऑडिट सुरू असताना पूर्व-पश्चिम जोडणाऱया उड्डाणपुलाचा भाग खचल्याच्या भीतीने रविवारी घाटकोपर-अंधेरी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. घाटकोपर पुलाखालून लोकलसह अनेक लांबपल्ल्याच्या गाडय़ा जात असल्याने अंधेरीसारखी घटना घडू नये यासाठी ही काळजी घेण्यात आली. या पुलाचा ताबा पोलिसांना घेत याची तातडीने तपासणी सुरू करण्यात आली.
जोरदार पावसाच्या माऱयाने मध्य रेल्वेचा विद्याविहार ते भायखळादरम्यानचा मेगाब्लॉक रद्द करण्यात येऊनही मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या गाडय़ा रविवारी १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. हार्बरवर वाशी व कुर्लादरम्यान ब्लॉक घेतल्याने प्रवाशांच्या हालात भरच पडली. पश्चिम रेल्वेने शनिवारी वांद्रे येथील उड्डाणपुलाचा दक्षिण बाजूकडील फुटपाथ आणि वसईचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करून टाकला होता. मालाडच्या पालिका कार्यालयाच्या दक्षिणेकडील पादचारी पूल ते रेल्वेचा दक्षिण पुलाला जोडणारा स्कायवॉक शनिवारी रात्रीपासून बंद करण्यात आला.
ग्रॅण्ट रोड पूल सुरक्षित; कोणताही धोका नाही
पश्चिम रेल्वेमार्गावरून जाणारा ग्रॅण्ट रोडचा उड्डाणपूल सुरक्षेसाठी बंद करण्यात आला होता. परंतु रेल्वे आणि महापालिकेने केलेल्या तपासणीत हा पूल संपूर्णपणे सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. नाना चौक आणि लॅमिंग्टन रोडमध्ये रेल्वे मार्गावरून जाणारा हा पूल पूर्णपणे सुरक्षित आणि सामान्य वाहतुकीसाठी उपयुक्त आहे. अंधेरी येथील पुलाचा भाग कोसळल्यानंतर ग्रॅण्ट रोड पुलाबाबत स्थानिक लोकांनी तक्रार केली होती. पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ विभागीय अभियंत्यांनी त्यांच्या स्ट्रक्चरल अहवालाद्वारे वाहतुकीसाठी या पुलाला सुरक्षित म्हणून जाहीर केले आहे. मलबार हिलचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी या पुलाची तातडीने स्ट्रक्चरल तपासणी करण्याची मागणी केली होती.
टिळकनगरचा पादचारी पूल पाडला
हार्बर मार्गावरील टिळकनगर स्थानकापासून २०० मीटर दूर असलेला १९८९ रोजी बांधलेला परंतु सध्या बंद असलेला पूल मध्य रेल्वेने खास ब्लॉक घेऊन पाडला. सांताक्रुझ- चेंबूर लिंक रोड उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर हा पूल बंद करण्यात आला होता. हा पूल तोडण्यासाठी दुपारी १२.०५ ते सायंकाळी ४.०५ दरम्यान ब्लॉक घेण्यात आला. त्यानंतर हार्बरची वाहतूक सुरू करण्यात आली.





























































