
सामना प्रतिनिधी । उदगीर
लातूर जिल्ह्यामध्ये लोकसंख्येच्या तुलनेत सर्वात मोठा उदगीर तालुका आहे. त्यामुळे येथे वाहनाची मोठी संख्या आहे. वाढती लोकसंख्या व वाहनांमुळे शहरात वाहतुकीची कोंडी दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे.
मागच्या दोन महिन्यात उदगीरात बेशिस्त वाहतुकीचे दोन बळी गेले आहेत. मात्र प्रशासनाचे अद्यापही डोळे उघडले नाहीत. बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी प्रशासनाकडून कुठल्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरिकांमधुन संताप व्यक्त केला जात आहे. दररोजच्या वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिकांना आपला जीव मुठीत धरून कोंडीतुनच मार्ग काढावा लागत आहे. उदगीर शहर व उपनगर असलेल्या निडेबन, मादलापूर, सोमनाथपूर, मलकापूर, लोणी येथील एकूण लोकसंख्या सुमारे दोन लाखापेक्षा अधिक आहे. त्याचप्रमाणे वाहनाची संख्या वाढलेली आहे. त्यातच अवैध प्रवासी वाहतूक करणारे खाजगी जीप, टमटम, ट्रॅव्हल्स यांचे थांबे बसस्थानक परिसरात भररस्त्यावर आहेत. तसेच शहरातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या परमीट व विनापरमीट अॅटोरिक्षांची संख्याही लक्षणीय आहे. या सर्व वाहनाबरोबरच तेलंगणामधील हैदराबाद ते नांदेड, लातूर ते देगलूर जाणारा मुख्य रस्ता शहरातुनच जातो. त्यामुळे अवजड वाहनांची नेहमीच वर्दळ, उत्पादक शेतकरी आपला भाजीपाला किरकोळ विक्रीस उदगीरला आणतात. त्यांना भाजीपाला विक्रीसाठी जागा उपलब्ध नसल्याने ते शिवाजी चौक ते पंचायत समिती, तहसिल कार्यालय, उपजिल्हाधिकारी कार्यालय परिसरात रस्त्यावरच आपले दुकान मांडतात. भाजीपाला व अन्य वस्तु खरेदीसाठी येणारे ग्राहक हे भररस्त्यातच त्यांचे दुचाकी, चारचाकी वाहने उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करतात.
शहरातील शिवाजी चौक, देगलूर रोडवरील येरोळकर हॉस्पिटल, बसस्थानक परिसर, दुध डेअरी परिसर, तहसिल कार्यालय, जयजवान चौक, पलेवार चौक, उमा चौक, शाहू चौक, कॅट्टन चौक आदी भागात दररोज दिवसापासून अनेकवेळा बेशिस्त वाहनांमुळे कोंडी निर्माण होत असते. उदगीरातील वाहतुकीची कोंडी एक गंभीर समस्या बनलेली असताना ती सोडवण्यासाठी प्रशासन कुठलीही भूमिका घेत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन व महसुल विभाग यांनी एकत्रित येऊन कोंडी सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. शिवाजी चौक, उमा चौक, जयजवान चौक या ठिकाणी सिग्नल अवस्था करून त्या ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात करणे गरजचे आहे.































































