मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; जगबुडी पुलावर ट्रक बंद पडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । खेड

मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी पुलावर मालवाहू ट्रक अचानक बंद पडल्याने महामार्ग सुमारे दोन तास ठप्प झाला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठय़ा रांगा लागल्या होत्या. कुटुंबकबिल्यासह कोकणात जाणारे चाकरमानी या वाहतूककोंडीत मात्र चांगलेच लटकले. वाहतूक व स्थानिक पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

सध्या उन्हाळी सुट्टी आणि लग्नसराई असल्याने मुंबईहून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. उन्हाळी सुट्टीचा आनंद उपभोगण्यासाठी कोकणात तसेच कोकणमार्गे गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांची संख्याही मोठी असल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील रहदारी कमालीची वाढली आहे.

महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामही युद्धपातळीवर सुरू असल्याने अनेक ठिकाणी रहदारीचा वेग मंदावू लागला आहे. त्यातच खेडनजीकच्या जगबुडी पुलावर एक अवजड मालवाहू ट्रक नादुरुस्त होऊन रस्त्याच्या मधोमध बंद पडला. चालकाने बंद पडलेला ट्रक सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या ट्रकमधील बिघाड दूर होऊ न शकल्याने मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला.

भरणे-खेड रस्त्यावरही ट्रफिक जॅम

काही वाहनचालकांनी भरणे नाका येथून व्हाया खेड शहरमार्गे चिपळूणकडे जाण्याचा प्रयत्न केला, मात्र भरणे-खेड रस्त्यावरही मोठय़ा प्रमाणात वाहतूककोंडी झाल्याने हा मार्गही वाहतुकीसाठी बंद झाला. भरणे नाका येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठय़ा प्रमाणात वाहतूक ठप्प झाल्याची खबर पोलिसांना मिळताच वाहतूक तसेच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.