प्रेमाचा आधुनिक गोंधळ दाखवणारा ‘मनमर्झिया’चा ट्रेलर प्रदर्शित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

सध्याच्या तरुणाईसाठी प्रेमाची व्याख्या काय? असा प्रश्न नेहमीच चर्चिला गेलाय. तंत्रज्ञानात अपडेटेड राहणारी तरुण पिढी नातेसंबंधांच्या बाबतीत मात्र सपशेल गोंधळलेली आहे. शारीरिक आकर्षण म्हणजेच प्रेम हे गृहित धरून चालणाऱ्या तरुणाईच्या प्रेमाचा आधुनिक गोंधळ दाखवणारा ‘मनमर्झिया’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

बराच काळ चित्रपटांपासून लांब राहिलेला अभिनेता अभिषेक बच्चन या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ट्रेलरवरून हा चित्रपट प्रेमत्रिकोण वाटतोय. विकी, रुमी आणि रॉबी अशा तीन मुख्य व्यक्तिरेखा या चित्रपटात दिसून येत आहेत. विकी कौशल, तापसी पन्नू आणि अभिषेक बच्चन यांनी या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. राझी, संजू या चित्रपटात विकी कौशलने आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे. त्याच्या अभिनयाची जादू याही चित्रपटात चालणार का, हे पाहण्यासारखं असणार आहे.

या चित्रपटाची निर्मिती आनंद एल. राय यांनी केली असून अनुराग कश्यप यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. सेक्रेड गेम्ससारख्या वेबसिरीजमुळे सध्या अनुराग कश्यप यांचंही नाव चांगलंच चर्चेत आलं आहे. मनमर्झिया हा चित्रपट येत्या १४ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

पाहा ट्रेलर-