मालगाडीने 11 गायींना चिरडले; ग्रामस्थ संतप्त, चौकशीचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । भरूच

गुजरातमध्ये भरूच जिल्ह्यात दहेज गावाजवळ सोमवारी संध्याकाळी एका मालगाडीने 11 गायींना चिरडले. तर 2 गायी गंभीर जखमी झाल्या. याप्रकरणी गावच्या सरपंचाने रेल्वे प्रशासनाविरोधात तक्रार दाखल केली असून घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहेज रेल्वे स्थानकाजवळ 1.5 किमी अंतरावर ही घटना घडली. भरूचवरून एक रिकामी मालगाडी येत असताना रेल्वे रुळावर उभ्या असलेल्या गायींच्या एका कळपाला तिने चिरडलं. 11 गायींचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी सरपंचाला दिली आणि गुरांच्या डॉक्टरांना देखील कळवण्यात आले. ग्रामस्थ आणि गुरांच्या डॉक्टरांची टीम तेथे दाखल झाली.

सरपंचानी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर रेल्वे कर्मचारी आणि अधिकारी तेथे पोहोचले. त्यांनी मृत गायींचे शव हटवले. आणि वाहतुकीसाठी रस्ता खुला केला. त्यानंतर सरपंचांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारावर मालगाडीच्या मोटरमनची चौकशी होणार आहे.

घटनेची चौकशी सुरू असून या गायी कुणाच्या मालकीच्या होत्या? या परिसरात कशा आल्या? याचा शोध घेत आहोत, असे पोलिसांनी सांगितले. तसेच मालगाडीच्या मोटरमनला गायींचा कळप कसा दिसला नाही ही देखील चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.