
बीएमडब्ल्यू कार चोरी प्रकरणात कारवाई न करण्यासाठी आरोपीच्या पत्नीकडे 12 लाखांची मागणी करून त्यापैकी दोन लाखांची रोकड घेताना गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलचे सहाय्यक निरीक्षक नागेश पुराणिक रंगेहाथ पकडले गेले. पुराणिक यांनी याआधी चार लाख घेतले होते.
मानवी (नाव बदललेले) यांनी दिलेल्या तक्रारीनंतर अॅण्टी करप्शन ब्युरोने ही कारवाई केली. प्रॉपर्टी सेलमध्ये बीएमडब्ल्यू कार चोरीचा गुन्हा दाखल आहे. त्या गुह्यात मानवी यांचा पती व पतीच्या मित्राचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले, पण दोघांवर कारवाई होऊ द्यायची नसेल तर 12 लाख रुपये द्या अशी मागणी एपीआय नागेश पुराणिक यांनी मानवी यांच्याकडे केली होती. यानुसार मानवी यांनी चार लाख रुपये दिले. त्यानंतर उर्वरित आठ लाख देण्यासाठी पुराणिक यांनी मानवी यांच्यामागे तगादा लावला होता. तडजोडीअंती चार लाख देण्याबाबत त्यांनी सांगितले. दरम्यान, पुन्हा पैसे द्यायचे नसल्याने मानवी यांनी अॅण्टी करप्शन ब्युरोकडे पुराणिक यांच्या विरोधात लेखी तक्रार केली होती.

























































