सीमाभागात कर्नाटकी अत्याचाराचा कहर सुरूच, मराठी भाषिकांवर राजद्रोहाचे गुन्हे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱयांवर कडक कारवाई करा, या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटकातील भाजप सरकारकडून अत्याचाराचा कहर सुरूच आहे. मराठी भाषिकांना कारागृहातच ठेवण्यासाठी विविध पोलीस ठाण्यांत अजूनही गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. आता तर थेट कर्नाटक सरकारविरोधात युद्ध पुकारल्याच्या नावाखाली मराठी भाषिकांवर राजद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात येऊ लागले आहेत.

पोलिसांनी तयार केलेल्या 61 मराठी भाषिकांपैकी 38 जणांना अटक केली आहे. उर्वरित 23 जण भूमिगत झाले आहेत. सध्या अटकेतील मराठी भाषिकांना दररोज न्यायालयाच्या चकरा मारून त्यांना कारागृहात ठेवण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी न्यायालय परिसरात नातेवाईकांच्या अश्रूंचे बांध फुटत आहेत. तर कर्नाटकी अत्याचाराची फिकीर न करणारे मराठी बांधवही तितकेच खंबीर असल्याचेही पुन्हा एकदा दिसून येत आहे.

बेळगावमध्ये कर्नाटक सरकारकडून हिवाळी अधिवेशन घेण्यात येत आहे. या अधिवेशनाला लोकशाही मार्गाने विरोध करण्यासाठी महामेळाव्यात मराठी भाषिक एकत्र आले असता कानडी पोलिसांच्या बंदोबस्तात महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडाकडून शाई फेकण्यात आली. सीमाभागासह महाराष्ट्रातही याचे संतप्त पडसाद उमटले. कोल्हापुरात शिवसैनिकांनी कन्नड रक्षण वेदिकेच्या लाल-पिवळा ध्वजाची होळी केली. यानंतर कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे ‘करवे’च्या गुंडांनी शिवसेनेचा भगवा ध्वज जाळण्याचा प्रयत्न केला. तर बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. त्याचे संतप्त पडसाद सीमा भागात उमटले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना कन्नड संघटनेच्या समाजपंटकांकडून झाल्याचे समोर आले. यातील काहीजणांना अटकही करण्यात आली. बेळगावसह सीमाभागात मराठी भाषिकांवर कानडी पोलिसांनी गुन्हे दाखल केले. पण आता कर्नाटक प्रशासनाकडून मराठी भाषिकांवरच अत्याचार सुरू असल्याचे दिसून येऊ लागले आहे. याप्रकरणी बेळगावचे जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, युवक समितीचे शुभम शेळके या मराठी भाषिक नेत्यांसह 61 जणांवर 17 डिसेंबरपासून गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी 38 मराठी भाषिकांचा मुक्काम अजूनही कारागृहातच राहावा, यासाठी विविध पोलीस ठाण्यांत त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

देवेंद्र फडणवीस; गृहमंत्री शहा, बोम्मई यांची भेट कधी घेणार?

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासह मराठी भाषिकांवर कारवाई होऊ नये यासाठी कर्नाटकातील भाजपचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेणार असल्याचेही सांगितले होते. अजूनही मराठी भाषिकांवर गुन्हे दाखल करण्यात येत असल्याने फडणवीस हे यात हस्तक्षेप करणार का, असा थेट सवाल सीमाभागातून उपस्थित केला जात आहे.