समुद्राचे पाणी गोडे करणाऱ्या प्रकल्पासाठी झाडांची बेसुमार कत्तल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा

ओएनजीसी प्रकल्पाला पाणी अपुरे पडत असल्याने समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प उरणच्या पिरवाडी किनाऱ्यावर उभारला जाणार असून त्यासाठी पिरवाडी समुद्र किनाऱ्यावरची नारळ, सुरू आणि निलगिरीसह इतर शेकडो मोठ्या वृक्षांची कत्तल सूरू आहे. एकीकडे बाजूचा नागाव समुद्र किनारा अरबी समुद्रांच्या लाटांनी गिळंकृत केला असताना दुसऱ्या बाजूला ओएनजीसी उभारत असलेल्या प्रकल्पामुळे हा किनाराही समुद्राच्या लाटा गिळंकृत करण्याची शक्यता असल्याने येथील नागरिक आणि निसर्गप्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे समुद्राचे खारे पाणी गोडे होणार की नाही हे माहित नसले तरी परिसर झाडांच्या बेसुमार कत्तलीमुळे भकास होणार आहे.

उरण तालुक्यातील नागाव, म्हातवली व चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील पिरवाडी किनारपट्टीवर केंद्र सरकारचा ओएनजीसी प्रकल्प 30-35 वर्षापूर्वी उभारण्यात आला आहे. या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात विषारी वायू बाहेर पडत असल्याने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी परिसरातील शेकडो हेक्टर क्षेत्रात ओएनजीसीने वृक्ष लागवड केली आहे. अगोदरच विकासाच्या नावाखाली परिसरातील द्रोणागिरी डोंगर पोखरून येथील वृक्षसंपदा नष्ट करण्यात आली आहे. ओएनजीसीतून ओकल्या होणाऱ्या विषारी वायुप्रदुषणामुळे या परिसरातील नागरीकांना श्वासाचे, हृदयाचे तसेच कर्करोगासारखे जीवघेण्या आजाराने ग्रासले आहे.

केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेतून समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याला प्रोत्साहन दिले जात आहे. त्याच धर्तीवर हा प्रकल्प उभारला जात असून ओएनजीसीने यासाठी ओएनजीसीच्या मालकीची पिरवाडी किनाऱ्याची जागा निवडली आहे. या जागेवर मोठ्या प्रमाणात मोठे वृक्ष होते. मात्र आत्ता त्याची छाटणी सूरू केली आहे. त्यामुळे समुद्राचे पाणी गोडे होणार की नाही हे माहित नसले तरी पिरवाडी किनारा मात्र आत्ता भकास होणार अशी भिती नागरीकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

ओनजीसी आपल्या मालकीच्या जागेत नविन प्रकल्प उभारत आहे. त्यासाठी ही झाडे तोडली जात असून त्यांनी ही झाडे तोडण्यास परवानगी दिली आहे, असे उरणचे वनपरिक्षेत्र अधिकारी शशांक कदम यांनी सांगितले.