
सामना प्रतिनिधी, मुंबई
रिक्षावर झाड कोसळून चालकाचा मृत्यू झाल्याची घटना मुलुंडला घडली. रविवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेत चालक अशोक शिंगरे (45) यांचा मृत्यू झाला तर प्रवासी राजेश भंडारी (29) याच्यावर एम. टी. अग्रवाल रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
या वर्षीच्या पावसाळ्यातील ही चौथी घटना आहे. मुलुंड पश्चिम येथील एन. एस. मार्गावर एचडीएफसी बँकेच्या समोरून रिक्षा जात असताना तेथील भलेमोठे झाड त्यावर कोसळले. या दुर्घटनेत रिक्षाचालक शिंगरे आणि प्रवासी राजेश भंडारी गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी दोघांना तत्काळ नजीकच्या पालिकेच्या एम. टी. अग्रवाल रुग्णालयात दाखल केले, मात्र गंभीर दुखापतीमुळे शिंगरे यांचा मृत्यू झाला. या झाडाची मुळे सडल्यामुळे झाड कमकुवत झाल्यामुळे हे झाड कोसळल्याची माहिती आहे.

























































