
सामना ऑनलाईन। भोपाळ
गुंतागुंतीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी संबंधित व्यक्तीची डीएनएन चाचणी करण्यात येते हे आपल्याला माहित आहे. पण आता देशात पहिल्यांदाच लाकडाच्या डीएनए चाचणीवरून जंगल माफियांचा छडा लावला जाणार आहे. मध्य प्रदेशमधील नौरादेही अभयारण्यात झाडाच्या डीएनएची चाचणी करण्यात आली आहे. देशात अशाप्रकारे झाडांची डीएनए चाचणी करण्याची ही पहीलीच घटना आहे.
नौरादेही अभयारण्यात मोठ्या प्रमाणावर जंगल माफिया झाडांची कत्तल करतात. याला आळा घालण्यासाठी वनविभागाने ही शक्कल लढवली आहे. यात आरोपींकडून जप्त करण्यात आलेले लाकूड, झाडाचे ओंडके किंवा लाकडाचा भुसा यांची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. या झाडांचे नमुने व ज्या जंगलात लाकूड चोरी झाली तेथील झाडांच्या डीएनएमध्ये साम्य आढळल्यास आरोपीला पकडणे वन विभागाला सोपे जाणार आहे. पुरावा म्हणून त्याचा वापर केला जाणार आहे. या चाचणीला य़श मिळाल्यानंतर देशातील इतर अभयारण्यांमध्येही ही चाचणी सक्तीची करण्यात येणार आहे. जर आरोपींनी झाडे तोडल्यानंतर त्याच्या लाकडाचा भुसा केला असेल तरीही या चाचणीमुळे तो पकडला जाणार आहे. डीएनएचे नमुने जबलपूर येथील प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठवले जाणार आहे.


























































