
तपोवनातील वृक्षतोडीवरून एका झाडाच्या बदल्यात दहा मोठी झाडे लावू, असा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी गाजावाजा केला. आंध्र प्रदेशातील राजमुंद्रीहून सुमारे साडेसातशे झाडे आणून त्यांचे मखमलाबादला रोपण केले. मात्र चौदा दिवसांतच ही झाडे सुकली आहेत. संगोपनाकडे दुर्लक्ष होत असून मंत्र्यांनी अट्टहास करीत जनतेच्या पैशांचा चुराडा केल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे.
तपोवनातील अठराशेहून अधिक झाडे तोडण्याच्या महापालिकेच्या निर्णयामुळे नाशिककरांमध्ये संतापाची लाट उसळली. पर्यावरणप्रेमींसह सर्व स्तरातून याला कडाडून विरोध झाला. अशा परिस्थितीतही वृक्षतोडीवर ठाम राहत बदनामी टाळण्यासाठी महापालिकेकडून हरित नाशिक अभियान हाती घेण्यात आले. या माध्यमातून मोठय़ा 15 हजार वृक्षांची लागवड करू, असे वक्तव्य पुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले. मखमलाबाद, फाशीचा डोंगर, तसेच गोदावरी नदीकिनारी वृक्ष लागवडीसाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले गेले. त्यानंतर आंध्र प्रदेशात राजमुंद्री येथे जाऊन महाजन यांनी झाडांची पाहणी केली. पंधरा फुटी सुमारे साडेसातशे झाडे 12 डिसेंबरपर्यंत नाशिक शहरात दाखल झाली होती. मखमलाबादच्या पॅनॉल रस्त्यालगत भोईर मळा परिसरात 15 डिसेंबरला झाडे लावण्यात आली होती.





























































