रोह्यात आदिवासी कुटुंबाला मारहाण; नऊजण गजाआड, आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी

रोहा तालुक्यातील भालगाव येथील आदिवा-सी वाडीतील एका आदिवासी कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी मुरुड पोलिसांनी ९ मारेकऱ्यांना अटक केली आहे. या सर्वच आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

मुरुड पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये दीपेश ठाकूर, विजय पाटील, परेश ठाकूर, विराज ठाकूर, करण चिपकर, सुजय शहापूरकर, दीपेश माळी, विनिते ठाकूर, सागर ठाकूर यांच्या समावेश आहे. भालगाव येथील आदिवासी वाडीत राहणारा कातकरी समाजाचा सुमित वाघमारे हा मिठागर येथील एका मुलीच्या सोबत तिच्या घरी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेला होता. त्या गोष्टीचा मनात राग धरून मिठागर येथील वरील ९ आरोपींनी भालगाव येथील आदिवासी वाडी येथील रस्त्यावर येऊन सुमितचे वडील मंगेश वाघमारे, आई संगीता वाघमारे, भाऊ साहिल वाघमारे व काका चंदर वाघमारे यांना बेदम मारहाण केली.

दोघांवर चाकूने वार केले. यात सर्वच जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी येऊन प्रथम जखमींना मुरुड ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर सर्वच आरोपींची उचलबांगडी केली. या प्रकारामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी माया मोरे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पोलिसांनी केलेल्या तपासाचा आढावा घेतला आणि तपास अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.