अवघड सोपे झाले हो! आता बोली भाषेतून शिक्षण मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नाशिक

आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांना आता त्यांच्या बोलीभाषेतून पाठ्यपुस्तकं मिळणार असल्याची घोषणा आदिवासी विकास आयुक्तालयाने नुकतीच केली. इयत्ता पहिली ते तिसरीच्या आदिवासी विद्यार्थ्यांना ११ आदिवासी बोलीभाषांमधून ४४ पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात येणार आहे. या संबंधीच्या सूचना बालभारतीला देण्यात आल्या असून या बोलीभाषांनुसार पुस्तकांचं वाटप करण्यात येणार आहे.

सध्या उत्तर महाराष्ट्रात पावरी, कोकई, मवाची, भिल मठवड, भिल आणि भिलारू इत्यादी आदिवासी बोली बोलल्या जातात. तर कोरकू, कोलम, गोंड, माडिया, वारली इत्यादी भाषा विदर्भातील आदिवासी समाजात बोलल्या जातात. सध्या अभ्यासक्रमात समाविष्ट असलेली पाठ्यपुस्तकं मराठी या प्रमाण भाषेत उपलब्ध आहेत. मात्र, महाराष्ट्रातील अनेकविध आदिवासी जमाती आणि त्यांच्या बोलीभाषा प्रमाण मराठीहून भिन्न आहेत. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाचा प्रवाह पोहोचवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येईल.

गेली तीन वर्षं पुणे येथील आदिवासी संशोधन आणि विकास संस्थेकडून या प्रकल्पावर काम सुरू होतं. महाराष्ट्रभरातील आश्रमशाळांमधील ५०हून अधिक शिक्षकांनी ही पाठ्यपुस्तकं भाषांतरित केली आहेत. या प्रकल्पाच्या समन्वयक गौरी पुरंदरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारचा प्रकल्प राबवण्यात येत आहे. अशाप्रकारे प्रमाणभाषेतील पुस्तके आदिवासी बोलीभाषांमध्ये भाषांतरित करण्याचे आदेश मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे राज्य सरकारला देण्यात आले आहेत. जेणेकरून, आदिवासी विद्यार्थी प्राथमिक शिक्षणाचे धडे त्यांच्या मातृभाषेतून गिरवू शकतील आणि त्यांची आकलन क्षमता वाढण्यास ही गोष्ट अत्यंत पूरक ठरू शकेल, असं मत पुरंदरे यांनी व्यक्त केलं आहे.