
अयोध्येतील श्रीराम मंदिर लढय़ात कारसेवक म्हणून शिवसैनिकांनी शौर्य गाजवले. आता मंदिराचे स्वप्न साकार होवून रामलल्ला विराजमान झाले. या लढय़ातील अमूल्य योगदानासाठी शिवसेनेच्या वाघांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्कार केला. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरील महाअधिवेशनात हा सत्कार सोहळा संपन्न झाला. सन 1992 मध्ये कारसेवा केलेले 29 शिवसैनिक या विराट सभेसाठी उपस्थित होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात मधुमती फर्नांडीस, प्रकाश अहिरे, बाबा कदम, मनोज वाल्मिकी, प्रमोद भावसार, मिलिंद वैद्य यांचा सन्मान करण्यात आला. कारसेवक चंद्रकांत कोटींबा प्रबाळे हे कुर्ला येथून या सभेसाठी आले होते. हे सर्व सत्काराने भारावून गेले. कारसेवकांच्या वतीने उद्धव ठाकरे यांचा प्रभू श्रीरामचंद्रांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.
असे आहे सन्मानचिन्ह
‘बाबरी मशिदीचे घुमट पाडणाऱ्या शिवसैनिकांचा मला अभिमान नव्हे, तर गर्व आहे,’ हे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शब्द सन्मानचिन्हावर आहेत. त्याखाली त्यांची सही आणि 6 डिसेंबर 1992 ही तारीख आहे. प्रभू श्रीरामचंद्र, छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख यांच्या प्रतिमा आहेत.



























































