नायगरा धबधबा तिरंग्याच्या प्रकाशाने झळाळला; हिंदुस्थानच्या कोविड लढय़ाला सलाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अदृश्य विषाणूचा लाखो लोकांना विळखा पडला आहे. रोज हजारोंचे बळी घेत आहे. देश अभूतपूर्व संकटात सापडला आहे. तरीही जिद्द, चिकाटी कायम आहे. या जीवघेण्या विषाणूचा सामना हिंदुस्थान मोठय़ा धाडसाने करत आहे. हिंदुस्थानच्या याच लढय़ाला जगाने सलाम केला आहे. अमेरिका आणि कॅनडाची सीमा दर्शवणारा नायगरा धबधबा हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज असलेल्या तिरंग्याच्या प्रकाशाने झळाळला आहे.

कॅनडातील ओण्टारियो येथे असलेला नायगरा हा जगातील सर्वात मोठा धबधबा म्हणून गणला जातो. सध्या त्यावर तिरंगी प्रकाशझोत सोडला गेला आहे. हिंदुस्थानच्या कोविडविरोधातील लढय़ात आम्हीही सोबत आहोत असा संदेश त्याद्वारे जगाने दिला आहे. गेल्या एक वर्षात नायगरा धबधबा हिंदुस्थानी राष्ट्रध्वजातील तिरंगी रंगाने झळाळण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी गेल्या ऑगस्ट महिन्यात हिंदुस्थानच्या 74 व्या स्वातंत्र्यदिनी कॅनडाच्या महत्त्वाच्या ठिकाणांवर अशाच प्रकारे तिरंगी प्रकाशझोत सोडले गेले होते.

त्या लढय़ामध्ये आम्ही विश्वासाने सोबत आहोत हे दाखवण्यासाठीच नायगरा धबधब्यावर कॅनडातील वेळेनुसार आज रात्री 9.30 ते 10 वाजता हिंदुस्थानी राष्ट्रध्वजातील केशरी, पांढरा आणि हिरव्या रंगाचा प्रकाशझोत सोडला गेला.