
कर्नाटकातील मराठी भाषिक सीमाभागात कन्नडसक्तीविरोधी आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या 9 हुतात्म्यांना बुधवारी बेळगाव येथे अभिवादन करण्यात आले. हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकावर पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी ‘अमर रहे अमर रहे, हुतात्मा अमर रहे’, ‘बेळगाव, कारवार, खानापूर, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, ‘रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल में’, या घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेसह मराठीभाषिकांकडून महाराष्ट्रातच जाण्याचा निर्धार कायम ठेवण्यात आला.
1956 मध्ये भाषावार प्रांतरचनेत जबरदस्तीने कर्नाटकात घुसडलेली बेळगाव, निपाणी, बिदर, भालकीसह 865 मराठी भाषिक गावे आजही महाराष्ट्रात येण्यासाठी धडपडत आहेत. कर्नाटक सरकारकडून सीमाभागात कन्नड भाषेची सक्ती केल्याच्या निषेधार्थ 1 जून 1986 मध्ये बेळगाव येथे आंदोलनातून एकवटलेल्या मराठीभाषिकांवर कानडी पोलिसांनी गोळीबार केला. यामध्ये मोहन पाटील, परशराम लाळगे, भरमाण्णा कदम, भावकू चव्हाण, मारुती गावडा, कल्लाप्पा उचगावकर, शंकर खन्नुकर, विद्या शिंदोळकर व प्रकाश बाळू पाटील असे नऊ मराठीभाषिक हुतात्म्ये झाले. दरवर्षीप्रमाणे आज सकाळी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकावर पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करून मराठी भाषिक सीमाबांधवांकडून अभिवादन करण्यात आले.
शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी अभिवादन केले. ते म्हणाले, सीमाप्रश्नाच्या लढय़ात प्रत्येकवेळी शिवसेना महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी बांधवांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली आहे. भविष्यातही सीमावासीयांसोबत राहून आपण लढा देऊ. सर्वांनी एकसंघ राहून आपली शक्ती दाखवून द्यावी, असे आवाहन करतानाच नियोजित हुतात्मा स्मारकासाठी शिवसेना सर्व सहकार्य करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर यांनीही सीमाभागातील नव्या पिढीला, 18 वर्षांवरील युवावर्गाला सीमाप्रश्नाचा लढा समजावून सांगण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवू तसेच सीमाप्रश्न व संयुक्त महाराष्ट्रासाठी शिवससैनिकांच्या बलिदानाची माहिती नव्या पिढीला करून देऊ असे सांगितले. महाराष्ट्रात शिवसेनेकडे सत्ता आहे. त्या बळावर लवकरात लवकर सीमाभाग महाराष्ट्रात सामील करून घ्यावा, असे आवाहन केले. तुमच्याकडे सत्ता आहे. त्यामुळे तुम्ही बेळगावात आला नाही तरी चालेल; पण महाराष्ट्रात, मुंबईत आंदोलन करा. आम्ही तेथे येऊन सहभागी होऊ, यातून केंद्र सरकारवर दबाव आणून प्रश्नांची सोडवणूक करा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे मनोज पावशे, शिवसेनेचे बेळगाव जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, बंडू केरवाडकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, माजी महापौर शिवाजी सुंठकर, सरिता पाटील, महिला आघाडीच्या रेणू किल्लेकर, सुधा भातकांडे, महादेव पाटील, दत्ता उघाडे, एस. एल. चौगुले, शिवानी पाटील, दत्ता जाधव, आर. एम. चौगुले, श्रीराम सेना हिंदुस्थानचे रमाकांत कोंडुसकर, निपाणी म. ए. समितीचे जयराम मिरजकर यांच्यासह सीमाभागातील मराठी भाषिक उपस्थित होते.
20 दिवसांत सरकारी परिपत्रके मराठी भाषेत उपलब्ध करून द्या; मराठी भाषिकांची मोर्चाद्वारे मागणी
हुतात्म्यांना अभिवादन केल्यानंतर बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिक गावांतील कन्नडसक्ती मागे घ्यावी आणि 10 दिवसांत सरकारी परिपत्रके मराठी भाषेत उपलब्ध करून द्यावीत, या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.



























































