ट्रिनिटी कॉलेज : डब्लिनचं नालंदा

>> द्वारकानाथ संझगिरी

आयर्लंडमध्ये डब्लिनच्या विमानतळावर उतरून हॉटेलकडे जाताना टॅक्सी ड्रायव्हरशी मराठीत बोलता येईल असं कधी वाटलं नव्हतं. म्हणजे गडकरी, जोशी, चव्हाण, गायकवाड, नाडकर्णी वगैरे आडनावाचा कुणीही टॅक्सी चालवत नव्हता. मराठी माणूस परदेशात जाऊन टॅक्सीचा धंदा फार क्वचित करेल. तो ड्रायव्हर केरळचा होता, पण आयुष्य पुण्यात दापोडीजवळ गेल्यामुळे मराठी माणसासारखा बोलत होता. त्याने आम्हाला डब्लिनच्या मध्यावर असलेल्या हेझलब्रूक हाऊस हॉटेलवर सोडलं. तिथे काऊंटरवरचा तरुण पुन्हा थेट मराठीत बोलला. मला क्षणभर कळेना की, आपण डब्लिनला आलोय की ढेबेवाडीला! त्या रिसेप्शनवरच्या मुलाचं नाव होतं रोहन नागलकर. तोही पुण्याचा होता. त्याक्षणी त्या रोहनने पुढच्या गल्लीत डाव्या हाताला चितळेंचं दुकान आहे आणि पुढच्या चौकात डब्लिन मारुती आहे सांगितलं असतं तरी मी त्याच्यावर विश्वास ठेवला असता. ‘तो तिथे काय करत होता?’’ हा प्रश्न  माझ्याही आला. तो म्हणाला, तो शिकतोय तिथे. मास्टर्स इन क्लाउड कम्प्युटिंग आणि मास्टर्स इन डाटा ऍनालिस्टचा कोर्स करत होता. जगात असा कोर्स अस्तित्वात आहे हेसुद्धा मला ठाऊक नव्हतं. एकदा व्हीजेटीआयमधून सिव्हिल इंजिनीअर झाल्यावर शैक्षणिक क्षेत्रात काय काय नवा माल आलाय हे मी वळूनही पाहिलं नव्हतं. इतकी शिक्षणाची भीती मनात बसली होती. शिकता शिकता तिथे तुम्हाला आठवडय़ाला चाळीस तास नोकरी करता येते म्हणून तो त्या हॉटेलात रिसेप्शनिस्टचे काम करत होता. देशाबाहेर मराठी माणसं नेहमीच एक चांगला वेगळा अनुभव देतात. त्याने आम्हाला विचारलं, ‘‘सकाळी लवकर निघाला असाल ना? तुमचा ब्रेकफास्ट झाला नसेल ना? आमच्या नियमाप्रमाणे आज तुम्हाला ब्रेकफास्ट देता येत नाही, पण निदान फळ आणि सीरियल्स तरी देतो.’’ पोटात भूक होतीच. मी खाण्यासाठी द्रौपदीची थाळी शोधत होतोच, त्याने आणून दिली. त्यानंतर पुढे दोन दिवस डब्लिनचा आमचा गाईड तोच होता.

तिथे महाराष्ट्रातून आलेली मुलं खूप होती. त्यांनी तिथे त्यांचा एक छोटा महाराष्ट्र स्थापन केला होता. त्यानेच मला ट्रिनिटी कॉलेज आणि त्या कॉलेजच्या लायब्ररीची आठवण करून दिली. काही वर्षांपूर्वी मी त्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये गेलो होतो, पण वेळेअभावी लायब्ररी पाहायची राहिली होती. यावेळी ती इच्छा मी पूर्ण केली. मुळात कॉलेज सुंदरच आहे. ब्रिटनची विद्यापीठं प्राचीन विशेषणं वापरावीत इतकी जुनी आहेत. हे ट्रिनिटी कॉलेज ऑक्सफोर्ड-केंब्रिजनंतरचं. हे कॉलेज 1592चं. ते बांधलं आणि वसवलं, डोळ्यांसमोर केंब्रिज – ऑक्सफोर्ड ठेऊनच. एक जुनी गंमत सांगण्यासारखी आहे. पूर्वीच्या काळी ऑक्सफोर्ड – केंब्रिज महिलांना डिग्री देतं नव्हतं. स्त्र्ााrला दुय्यम समजणं हे फक्त हिंदुस्थानातच होतं असं नाही. ऑक्सफोर्ड-केंब्रिज मुलींना शिकवत, त्यांची परीक्षा घेत, त्यांचे निकाल घोषित करत, पण डिग्री मिळवण्यासाठी त्यांना डब्लिनच्या ट्रिनिटी कॉलेजला जावं लागे. ट्रिनिटी कॉलेज आणि डब्लिन विद्यापीठ यातून एकच अर्थ ध्वनित होतो. अनंत विषयांच्या पदव्या तुम्हाला इथून मिळू शकतात. या कॉलेजच्या सोळा टक्के जागा या देशाबाहेरील विद्यार्थ्यांसाठी असतात. त्यातल्या चाळीस टक्के युरोपियन  देशांसाठी. उर्वरित उरलेल्या जगासाठी! म्हणून तिथे हिंदुस्थानी आणि विशेषतः मराठी विद्यार्थी दिसतात.

ज्यांना फक्त ट्रिनिटी कॉलेज पाहायला जायचंय, त्यांच्यासाठी तिथलं वाचनालय हा एक वेगळा अनुभव आहे. तो पाहण्यासाठी चक्क चौदा युरोचं (एक हजार रुपये) तिकीट आहे, पण ज्याचं पुस्तकावर प्रेम आहे, त्याच्यासाठी ते हजार रुपये एक रुपयासारखे आहेत. 1712 ते 1732 या वीस वर्षांत हे ग्रंथालय उभं राहिलं. त्यात जुन्यात जुनी दोन लाख पुस्तकं आहेत आणि तरीही ही आयर्लंडमधील सर्वात जुनी लायब्ररी नाही. सेंट पॅट्रिक कॅथेड्रलजवळ एक ग्रंथालय आहे. ते यापेक्षा जुनं आहे. ज्ञान कसं जमवून ठेवलंय ते पहा.

या ग्रंथालयाची तीन आकर्षणं आहेत. एक ‘बुक ऑफ केल्स’. ‘बुक ऑफ केल्स’ हे कॅथलिक ख्रिस्तांचं पवित्र पुस्तक. लॅटिन भाषेतली चार गॉस्पेल्स या चित्रमय पुस्तकात आहेत. हे पुस्तक साधारण ख्रिस्तजन्मानंतर आठशे सालातलं आहे. आजही त्याबद्दलचं आकर्षण कमी झालेले नाही. का होईल? उद्या व्यासांनी लिहिलेलं ‘महाभारत’ आणि त्यातली ‘भगवद्गीता’ डोळ्यांनी पाहायला मिळाली तर आपण गर्दी करूच ना? सहाशे पानांच्या या पुस्तकाची फक्त दोन पानं नटवलेली नाहीत. बाकी अख्खं पुस्तक प्रेक्षणीय केलंय. ती दोन पानं तरी का सोडली देव जाणे! पाश्चात्त्य जग ‘बुक ऑफ केल्स’ला जगातलं सर्वात जुनं पुस्तकं मानतं.

हे ग्रंथालय कॉपीराईट ग्रंथालय आहे. म्हणजे आयर्लंडमध्ये पब्लिश होणारं प्रत्येक पुस्तक तिथं मोफत द्यावंच लागते. जगात इतरत्र अशी ग्रंथालयं नसावीत. इथली ‘लॉगरूम’ही लॉर्डस्च्या लॉगरूमएवढीच सुप्रसिद्ध आहे. पासष्ट मीटर्स ती लांबीला आहे. नव्याने येणारी पुस्तकं मावावीत म्हणून 1860 साली छप्पर उंच केलं गेलं. त्याचबरोबर तिथे मार्बलमध्ये तयार केलेले विविध लेखक, कवी, तत्त्वज्ञ यांचे पुतळे बसवले गेले. त्यात प्लॅटो, सर आयझॅक न्यूटन, विल्यम शेक्सपिअर, सॉक्रेटिस, अरिस्टॉटल वगैरेंचे पुतळे आपलं लक्ष वेधून घेतात. कारण या मंडळींबद्दल आपल्याला माहिती असते. तिथं एक वाद्य आपलं लक्ष वेधून घेते. त्याचं नाव ब्रायन बोरू हार्प. आयर्लंडचे ते राष्ट्रीय सिम्बॉल आहे. ते मध्ययुगातलं म्हणजे 14-15 व्या शतकातलं वाद्य असावं. त्याला पितळेच्या एकोणतीस तारा आहेत.

हे सर्व कौतुकाने पाहताना माझं मन हजार वर्षे मागे गेले. आपल्याकडे असंच एक नालंदा विद्यापीठ होते. तिथे नऊ लाख पुस्तके होती. ती तुर्की आक्रमकांनी जाळली. धर्माची अफूची गोळी घेतलेल्यांना याची जाणीव नव्हती की, एक जागतिक ठेवा ते जाळतायत. नाहीतर आज त्यापेक्षा जास्त कौतुक मी नालंदाचं करत असतो.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या