
काळ आला होता, पण वेळ नाही… याचा प्रत्यय आज सकाळी बोरघाटात आला. जुन्नर-निमगाव येथून कोकण दर्शन घेण्यासाठी चाललेल्या विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसचे अचानक ब्रेक फेल झाले आणि सर्वांची पाचावर धारण बसली. चालक, वाहक तसेच शिक्षकांनी देवाचा धावा केला. भेदरलेले विद्यार्थीही रडू लागले. पण अवघ्या काही क्षणातच चालकाने शिताफीने नियंत्रण सुटलेल्या बसवर ताबा मिळवला आणि बस रस्त्याच्या कडेला उभी केली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या बसमधून ४० विद्यार्थी आणि दोन शिक्षक प्रवास करत होते. केवळ दैव बलवत्तर म्हणून सर्व जण बालबाल बचावले.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर-निमगाव येथील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या तीन बस कोकण दर्शनासाठी निघाल्या. सहलीचा आनंद घेत, गाणी म्हणत विद्यार्थी जुना मुंबई-पुणे महामार्गावरील मिळ गावाजवळ पोहोचले असता ९ च्या सुमारास एसटीचे ब्रेक निकामी झाले. ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्याने अत्यंत सतर्कतेने व कौशल्याने बसचा वेग कमी केला आणि एसटीवर नियंत्रण मिळवले.
… आणि भेदरलेली मुले शांत झाली
ब्रेक फेल झाल्याचे समजताच सर्व मुले भीतीने थरथरत होती. मात्र शिक्षक आणि बसचालकाने मुलांना धीर दिला. त्यानंतर मुले शांत झाली. सर्व मुलांना एसटीमधून उतरवून दुसऱ्या बसमधून सुखरूप रवाना केले. यातील काही मुलांनी आपल्या आईवडिलांना याची माहिती दिली. तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. मात्र सर्व मुले सुखरूप असल्याचे समजताच पालकांचा जीव भांड्यात पडला. या घटनेमुळे प्रचंड गोंधळ उडाला होता. एसटी नियंत्रणात आली नसती तर तीव्र उतारावर बस पलटी होऊन मोठा अनर्थ घडला असता.


























































