तिहेरी तलाक कायद्यातंर्गत नेवासामध्ये पहिला गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तिहेरी तलाक (मुस्लिम महिला विवाह संरक्षण) कायदा संसदेत मंजूर झाल्यानंतर यातील तरतुदीनुसार नेवासा पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. सोमवारी रात्री उशिरा याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुमैय्या शाहिद पिंजारी (रा.नाईकवाडी मोहल्ला, नेवासा खुर्द) यांनी नेवासा पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माझे लग्न 26 ऑगस्ट 2013 रोजी शाहिद आयुब पिंजारी (रा.शिंगणापूर रेल्वे स्थानक, ता.कोपरगाव) यांच्याशी धार्मिक रीतीरिवाजप्रमाणे झाले होता. पती शाहिद आयुब पिंजारी,सासू सुलताना आयुब पिंजारी,सासरे आयुब दादामिया पिंजारी यांनी सुरुवातीला मला चांगले नांदविले. मात्र, त्यानंतर त्यांनी नवीन घर बांधण्यासाठी मला माहेरून दोन लाख रुपये घेऊन ये असे सांगितले. माझे आई -वडील गरीब असल्याचे त्यांना सांगितल्याने त्याचा त्यांना राग येऊन त्यांनी मला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत तुझ्या आई वडिलांकडून पैसे आण, असा दम देत त्यांनी मला घराबाहेर काढले. ही घटना मी माझ्या माहेरच्या लोकांना सांगितली. त्यानंतर मी माझ्या माहेरी नेवासा येथे राहिले. त्यानंतर माझे वडील व नातेवाईकांनी सासरच्या लोकांकडे जाऊन मुलीला नांदवा असे समजावले. आमच्याकडे पैसे आल्यावर तुम्हाला देऊ असे सांगत मला सासरी नांदायला सोडून सर्वजण नेवासा येथील घरी परतले.

एक ते दीड महिन्याने माझ्या नणंदा हिना शाफिक पिंजारी (रा.वाळुंज.जि. संभाजीनगर) व अफसना नवाज पिंजारी (रा. नेवासा खुर्द) यांनी माझ्या सासरी आल्यानंतर सासू, सासरे यांचे कान भरून माहेरून पैसे आणत नाही तो पर्यंत मला नांदवू नका असे सांगितले. त्यामुळे सासरच्या मंडळींनी शिवीगाळ करत माझा पुन्हा शारीरिक छळ सुरू केला. त्या त्रासाला कंटाळून मी पुन्हा माहेरी नेवासा येथे निघून आले. त्यानंतर नेवासा न्यायालयात मी सासरच्या लोकांविरुद्ध पोटगी मिळावी यासाठी 31 ऑगस्ट रोजी अर्ज दाखल केला होता. न्यायालयात हजर होतो तारीख झाल्यानंतर दुपारी अडीचच्या सुमारास पती शाहिद तेथे येऊन पोटगी अर्ज मागे का घेत नाही असे विचारले असता वडिलांनी त्यांना सांगितले की सुमैय्याला नांदायला घेऊन जा, अर्ज मागे घेतो असे म्हणताच त्यांना राग आल्याने माझ्या आई,वडिलांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देत मला तीन वेळेस तलाक तलाक म्हणून बेकायदा तलाक दिला आहे. याप्रकरणी शाहीद आयुब पिंजारी, सुलताना आयुब पिंजारी, आयुब दादामिया पिंजारी ,हिना शाफिक पिंजारी व अफसना नवाज पिंजारी यांच्याविरुद्ध मुस्लिम महिला विवाह संरक्षण कायदा 2019 चे कलम चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.