
सामना ऑनलाईन | देहरादून
तिहेरी तलाकवर कायदेशीर बंदी असताना देहरादूनमधील एका पतीने आपल्या पत्नीला तीन तलाक दिला. तसेच पोटगी देण्यासही नकार दिला आहे. पीडित पत्नीने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. उत्तराखंड मधील रायपूरमध्ये रईस कुरेशी हे आपल्या पत्नीसोबत राहत होते. पतीचे वय ४० असून पत्नीचे वय २१ आहे. कुरेशी यांनी आपल्या पत्नीला तीन तलाक देऊन भर पावसात बाहेर काढले. कुरेशी यांची पत्नी गरोदर आहे. तरी कुरेशी निर्दयपणे वागले.
सर्वोच्च न्यायालयाने २०१७ मध्ये तिहेरी तलाक असंवैधानिक असून बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा दिला होता. तसेच केंद्र सरकारला यावर कायदा करण्याचे निर्देशही दिले होते. यानंतरही तिहेरी तलाकच्या घटना समोर येत आहे.
या घटनेनंतर पीडित पत्नीने स्थानिक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडे मदत मागितली. कार्यकर्त्यांनी महिलेसह पोलीस स्थानक गाठले आणि पतीविरोधात तक्रार दाखल केली. गेल्या वर्षी पीडित पत्नीचे कुरेशीसह लग्न झाले होते. सदर महिलेने पहिल्या पतीला एचआयव्ही असल्याने घटस्फोट दिला होता. या महिलेला पहिल्या पतीपासून दोन मुलेही आहेत. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी पीडित महिलेला न्याय मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले.
केंद्र सरकारने तिहेरी तलाकवर कायदा केला असून त्यात तिहेरी तलाक देणार्या पतीला ३ वर्षाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सदर कायदा लोकसभेत पारित झाला असून राज्यसभेत तो अडकला आहे.





























































