मनोरुग्ण महिलांची दिवाळी उत्साहात, ट्रॉम्बे पोलिसांनी दाखवली खाकीतली माणुसकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> आशीष बनसोडे

लॉकडाऊननंतर यंदाची दिवाळी सर्वत्र उत्साहात साजरी झाली. सण साजरा होत असतानाच ट्रॉम्बे पोलिसांच्या कामगिरीमुळे खाकीतल्या माणुसकीचे दर्शन घडले. निर्भया पथकाने रस्त्यावर फिरणाऱया दोघा मनोरुग्ण महिलांना आपल्या कुटूंबियांप्रमाणे वागणूक देत त्यांची दिवाळी आनंदमय केली. इतकेच नाही तर कर्जतच्या एका आश्रमात त्यांची राहण्याची व्यवस्थादेखील करून दिली.

दिवाळी दरम्यान चित्ता कॅम्प मार्केट परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता ट्रॉम्बे पोलिसांचे निर्भया पथक तेथे गस्त घालत होते. त्या वेळी उपनिरीक्षक शैलाबी पठाण यांना मळकटलेले जुने कपडे घातलेली महिला दिसली. ती लंगडतही होती. पठाण यांनी त्या महिलेची विचारपूस केली असता तिला नीट सांगता येत नव्हते. संगीता वाघेला असे नाव असल्याचे सांगणाऱया त्या महिलेला तिच्याबद्दल काही विचारले की वेगवेगळी उत्तरे द्यायची. तिच्या पायाला दुखापत झाल्याने पठाण यांनी अश्विनी जाधव, पंडित, काळे या पथकासह संगीताला शताब्दी रुग्णालयात नेले. तेथे तिच्यावर उपचार करण्यात आले. बाहेरचं खाऊन संगीताच्या पोटात दुखत होते, त्यावर उपचार करून तिची आरटी-पीसीआर चाचणी केली. इतकेच नाही तर तिला कोविशिल्डचा पहिला डोसदेखील दिला. त्यानंतर संगीताला पोलीस ठाण्यात नेऊन तिची आस्थेवाईकपणे दोन दिवस काळजी घेण्यात आली. हे चालू असतानाच मानखुर्द रेल्वे ठाण्याच्या दिशेने जाणाऱया मार्गावर एक महिला एकटीत फिरत असल्याचा मेसेज आल्याने पठाण यांनी लगेच धाव घेऊन त्या महिलेलादेखील मदत केली. सूरजमुखी माथुर असे या मनोरुग्ण महिलेचे नाव आहे. शैलाबी पठाण यांनी तिलादेखील शताब्दी रुग्णालयात नेऊन तिच्यावर उपचार केले. त्यानंतर संगीता आणि सूरजमुखी या दोघींची कर्जत येथील श्रद्धा फाऊंडेशनच्या आश्रमात राहण्याची सोय करून दिली आहे.

नवीन कपडे, फराळ

संगीता आणि सूरजमुखी या दोघीही मनोरुग्ण आहेत. काwटुंबिक वादामुळे सूरजमुखीच्या मानसिकतेवर परिणाम झाला होता, तर संगीताला काहीच सांगता येत नव्हते. असे असताना शैलाबी पठाण यांनी दोघींना दुकानात नेऊन त्यांच्या आवडीचे कपडे घेऊन दिले. त्यांना आवडते खाद्यपदार्थ खाऊ घातले. यामुळे त्यांच्या चेहऱयावर आनंद दिसला.