टीआरपी घोटाळा – आणखी दोन चॅनल्सची नावे उघड

टीआरपी घोटाळ्यात आणखी दोन चॅनल्सची नावे समोर आली आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या दिनेश विश्वकर्मा आणि रामजीच्या चौकशीत ही माहिती समोर आली. तर टीआरपी प्रकरणात पोलिसांनी चार भादंवि कलमाची वाढ केली आहे.

मुंबई क्राईम ब्रँचने टीआरपी घोटाळ्यात हंसाचे माजी कर्मचारी असलेल्या दिनेश आणि रामजीला अटक केली होती. त्या दोघांची पोलिसांनी कसून चौकशी केली. त्या चौकशीत एका हिंदी वृत्त वाहिनी आणि चित्रपटाशी संबंधित अशा दोन चॅनल्सची नावे समोर आली आहेत. ज्याना पैसे देऊन चॅनल्स पाहायला लावले जात होते, ती घरे पोलीस तपासत आहेत. कोणत्या एजंटच्या माध्यमातून पैसे वाटप झाले, या दोघांनी किती घरात बेरोमीटर लावले आहेत, कोणत्या चॅनल्ससाठी एजंटकडून पैसे घेतले आहे का याचा पोलीस तपास करणार आहेत.

टीआरपी घोटाळ्यात पोलिसांनी आणखी भादंवि कलम 174 (वारंवार समन्स पाठवून चौकशीला हजर न राहणे), 179 (चौकशी दरम्यान जे प्रश्न विचारले जातात त्याची उत्तरे न देणे) 179 (आरोपीला मदत करण्याच्या दृष्टीने पुरावा नष्ट करणे) आणि 204 (चौकशी दरम्यान विचारले गेलेले प्रश्न सार्वजनिक करणे) या कलमाची वाढ केली आहे.

आज पोलिसांनी दिनेश विश्वकर्मा, रामजी वर्मा व उमेश मिश्राला न्यायालयात हजर केले. उमेशला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी तर दिनेश आणि रामजीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. क्राईम ब्रँचने रिपब्लिक टीव्हीचे कार्यकारी संपादक निरंजन स्वामी, सीएफओ शिवा सुंदरमचा जबाब नोंदवला. गुरुवारी देखील त्या दोघांना पुन्हा जबाब नोंदवण्यासाठी बोलवले जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या