
विजय जोशी । नांदेड
मृगनक्षत्राची सुरुवात झालेली असताना या आठवड्यात दमा, आस्थमा व अन्य रोग्यांसाठी मासे खाणे हे आरोग्यासाठी चांगले असते. बाजारात वेगवेगळ्या मासळी दुकानांवर गर्दी होत असताना नांदेडच्या कामठा फाट्यावर दर्जेदार मासळ्यांचा ट्रक उलटल्याने या भागातील मासे शौकीनांनी अक्षरशः या मासळीवर ताव मारुन त्या मासळ्या लुटल्या. ट्रक धारकांना मदत करणे गेले कुठे मात्र या भागातील अनेक नागरिकांनी या मासळ्या लुटल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या मृगनक्षत्राचा पहिला आठवडा सुरू आहे. नांदेडच्या शुक्रवार, बुधवार व रविवारच्या बाजारात मोठ्या प्रमाणात मासळीची विक्री होते. त्यातच पाऊस पडल्यामुळे चांगली मासळी बाजारातही आली आहे. सध्या मासळीचा भाव दोनशे ते अडीचशे रुपये प्रतिकिलो असून, कॅथलिक मासे पाचशे ते साडेपाचशे रुपये किलो आहे. दर्जेदार मासळीचेही भाव वाढले आहेत. मात्र कामठा फाटा परिसरातील नागरिकांना फुकट मासे खाण्याची संधी उपलब्ध झाली. माणुसकीचा कुठलाही लवलेश न ठेवता पलटलेल्या मासळीच्या ट्रकवर जनतेने अक्षरशः उडी घेतली व मासळी पळवून नेली. आज सकाळी बेंगलूरहून लखनोच्या दिशेने दहा टन कॅथलिक जातीची मासे घेवून जात असलेला ट्रक चालकाला गुंगी आल्याने पलटी झाला. अत्यंत महागडे असलेले हे मासे नांदेडसारख्या छोट्या शहरात मिळत नसल्यामुळे हे मासे नेण्यासाठी लोकांची झुंबड उडाली. लोकांचा जमाव पाहता ट्रक चालकानेही जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. जवळपास चार टनापेक्षाही जास्त मासे नागरिकांनी लुटले. यामुळे या परिसरातील वाहतूक जवळपास एक तास ठप्प झाली होती. ट्रकच्या रांगा त्यात मासे लुटण्यासाठी झालेली झुंबड यामुळे वाहतुकीत चांगलाच खोळंबा झाला होता. विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या या प्रकाराबाबत विमानतळ पोलीस ठाणे जवळपास एक तास अनभिज्ञ होते. त्याठिकाणी तीन कर्मचारी पाठवण्यात आले, मात्र त्यांनी हा प्रकार न रोखता केवळ बघ्याची भूमिका घेतली.
याबाबत पोलीस उपअधीक्षक अभिजित फस्के यांना विचारणा केली असता त्याबाबत सविस्तर माहिती घेऊन चौकशी करतो, असे उत्तर त्यांनी दिले. वाहतुकीचा झालेला खोळंबा व नागरिकांनी माणुसकी शून्य भावनेचे दाखविलेले दर्शन लक्षात घेता माणसातील विकृती किती वाढली आहे याचाच हा प्रत्यय आहे.



























































