भाजीविक्रेता, सच्चा शिवसैनिक झाला सरपंच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूर जिह्यातील दुर्गम अशा शाहूवाडी तालुक्यात डोंगरकपारीतील वरेवाडी गावचा आनंदा रामचंद्र भोसले हा एक भाजीविक्रेता थेट सरपंचपदी निवडून आला. एक सच्चा शिवसैनिक अशी ओळख असलेल्या आनंदा भोसले यांनी विजयानंतर थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा उंचावत आपला अभिमान आणि आनंद व्यक्त केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वाभिमानाप्रमाणे हा आपला विजय असून, यापुढेही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कायम शिवसैनिक म्हणूनच समाजसेवा करणार असल्याचे आनंद भोसले यांनी सांगितले.

शाहुवाडी येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कोल्हापूर शहरात एका हॉटेलमध्ये नोकरी करताना आनंद भोसले यांनी पत्रकारितेचे शिक्षणही घेतले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रभावित झालेल्या आनंद भोसले याची पहिल्यापासूनच शिवसेनेशी नाळ जोडली गेली. त्यातून शिवसेनेच्या आंदोलनात सहभागी होण्यासह आपल्या दुर्गम गावातही शिवसैनिक म्हणूनच समाजकार्य करण्यास सुरुवात केली. गावातच त्यांनी भाजीविक्रीचा व्यवसाय सुरू केला.

पंचक्रोशीत एक सच्चा शिवसैनिक अशी ओळख असलेल्या आनंदा भोसले यांनी गावातील ग्रामपंचायत निवडणूक लढवून थेट सरपंचपदी विराजमान होऊन सर्वांचे लक्ष वेधले. त्यांना 391 मते मिळाली. तर, विरोधात जनसुराज्यचे विश्वास भोसले यांना 330 मते मिळाली.