
डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर लादलेला 25 टक्के टॅरिफ 50 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. त्याचा परिणाम गुरुवारी शेअर बाजारात दिसून आला. थोड्याशा घसरणीसह बाजार सुरू झाला. मात्र, व्यवहाराला सुरुवात झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये वेगाने मोठी घसरण झाली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या वाढवलेल्या टॅरिफची शेअर बाजाराने धास्ती घेतल्याने गुरुवारी दिसून आले. बाजाराला सुरुवात होताच सुरुवातीला सेन्सेक्स-निफ्टीवर कोणताही विशेष परिणाम झाला नाही. मात्र, व्यवहाराला सुरुवात होताच निर्देशांकांमध्ये मोठी घसरण झाली. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 450 पेक्षा जास्त अंकांनी घसरला आणि 80,000 च्या महत्त्तवाच्या टप्प्यापर्यंत खाली आला होता. निफ्टीही 150 पेक्षा जास्त अंकांनी घसरला. या काळात, अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर्स देखील अचानक घसरलेले दिसले. यामध्ये अदानी पोर्ट्स (3%), टाटा मोटर्स (2.50%) आणि टाटा स्टील (1.50%) सारखे शेअर्स आणि लार्ज कॅप कंपन्याचे शेअर आहेत.
भेल, बायरक्रॉप, कॉन्कोर, इमामी,गोदरेज इंडिया, जीपीटी हेल्थ, जीएनएफसी, लुमॅक्स इंडिया आणि सिगाची इंडस्ट्रीज या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, शेअर बाजारावर 50% टॅरिफचा किरकोळ परिणाम दिसून येत आहे. बाजारात ही घसरण मर्यादित आहे. भारतीय बाजारपेठांनी यापेक्षा बिकट परिस्थितीचा सामना केला आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.