पप्पांचे मार्गदर्शन महत्त्वाचे! – तृप्ती तोरडमल

39

ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल यांची कन्या तृप्ती तोरडमल प्रॉडक्शन सुरू करता करता अभिनेत्री बनली.

भूमिकेचा  जास्त अभ्यास करू नकोस. कारण त्यामुळे तुझ्यातला स्पॉन्टॅनिटी निघून जाईल… हा ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल यांचा सल्ला घेऊन त्यांची कन्या तृप्ती आता मराठी सिनेमांमध्ये पाऊल ठेवतेय. तिची पहिलीच भूमिका असलेला ‘सविता दामोदर परांजपे’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होईल. ग्लॅमरस तर ती आहेच, पण तशा भूमिका मात्र आपल्याला करायच्या नाहीत यावर तृप्ती ठाम आहे. अभिनेत्री म्हणून आपल्याला ओळख मिळावी ही तिची महत्त्वाकांक्षा आहे. प्रत्येक रोल वेगळा आणि चॅलेंजिंग असला पाहिजे. परफॉर्मन्स ओरिएंटेड भूमिका असली पाहिजे यावर माझा भर असेल. ग्लॅमरस भूमिका करायच्या असत्या तर मॉडेलच झाले असते, असंही तिने स्पष्ट केलं.

तृप्तीला खरं तर प्रॉडक्शन कामात जास्त रस आहे. तिला मराठी सिनेमाची निर्मिती करायची होती. याबाबत ती म्हणते, जॉन अब्राहम माझे फॅमिली फ्रेंड आहेत. त्यांना मी हे सांगितलं. तेही म्हणाले की मराठी सिनेमांचे विषय आता वेगवेगळे असतात. आपण दोघे मिळून ही निर्मिती करूया. त्यात अभिनयही तूच कर. त्यानंतर त्यांनीच दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे यांच्याशी भेट घालून दिली. प्रॉडक्शनच करायचं होतं, पण मग अभिनयही केलाय. भूमिका मला आवडली म्हणून या भूमिकेला हात घातला.

पहिल्याच भूमिकेसाठी तृप्तीला खूप अभ्यास करावा लागला. याबाबत ती म्हणते, माझी भूमिका दुहेरी होती. त्यासाठी मला अभ्यास तर खूप करावा लागला. रिमाताईंचं नाव होतं. पप्पांचं नाव होतं. तशी मी लहानपणापासून खूप हुशार वगैरे नसले तरी अभ्यासू होते. खूप अभ्यास करून परीक्षेत पास व्हायचे. त्यामुळे पप्पांना विचारायचे की असं करू की तसं करू?

पप्पांच्या नावाचा गर्वच

मधुकर तोरडमल यांची मुलगी तृप्तीला नक्कीच फायदा झाला असणार. याबाबत छेडले असता ती म्हणते, पप्पांना आपल्या मराठी सिनेमा नाटय़ इंडस्ट्रीत जो मान सन्मान आहे तो मला खूप आवडतो. त्यांचं नाव माझ्या नावामागे लागलंय हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं तर आहेच, पण वडिलांचा वारसा पुढे घेऊन जातेय, याचा मला गर्व आहे. बरेचजण विचारतात पप्पांच्या नावाचे दडपण वाटते का… पण दडपण का वाटावं? आईवडिलांकडून जे आपल्याला मिळतं त्याचा प्रेशर येऊच शकत नाही. त्यांचं नाव माझ्याशी जुळतंय म्हणून मलाही त्यांच्यासारखाच रिस्पेक्ट मिळतोय. हा रिस्पेक्ट पप्पांचा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या