देशाला, संविधानाला वाचविण्यासाठी सर्वांची एकजूट करतोय! बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे प्रतिपादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाला आणि संविधानाला वाचविण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. सर्वांनी एकजूट केली तर आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव अटळ आहे, असे स्पष्ट प्रतिपादन बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज केले.

भाजपविरोधात विरोधकांची एक सक्षम आघाडी निर्माण करण्यासाठी नितीशकुमार यांनी पुढाकार घेतला असून ते देशभरातील विरोधी पक्षप्रमुखांशी प्रत्यक्ष भेटून चर्चा करत आहेत. आज त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हेसुद्धा उपस्थित होते.

यावेळी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, विनायक राऊत, आमदार कपिल पाटील उपस्थित होते.

देशाचा इतिहास बदलला जातोय

पत्रकारांशी बोलताना नितीशकुमार यांनी भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार प्रहार केले. मोदी सरकार बाकी काहीच काम करत नाही. फक्त देशाचा इतिहास बदलण्याचे काम सुरू आहे. भाजपचा मुळात स्वातंत्र्यलढय़ाशी संबंधच काय? आता ते फक्त नामकरण करण्याचे काम करत आहेत, अशी टीका करून नितीशकुमार म्हणाले, भाजपला हरवण्यासाठी देशातील अधिकाधिक पक्षांनी एकत्र येऊन लढले पाहिजे. देशाच्या हितासाठी सर्वांनी आपापसातील वाद-विवाद बाजूला ठेवले पाहिजेत.

चेहरा महत्त्वाचा नाही, एकत्र येणे गरजेचे

विरोधकांचा ‘चेहरा’ कोण? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता नितीशकुमार स्पष्टपणे म्हणाले की, ‘चेहरा’ महत्त्वाचा नाही, तर सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे आणि त्यासाठीच मी पुढाकार घेतला आहे. सर्व विरोधी पक्षांची बैठक कधी होणार हे लवकरच ठरवू असेही ते म्हणाले. देशात सगळेच दबावाखाली काम करत आहेत. प्रसारमाध्यमेही दबावात आहेत. मोदी सरकार काहीच काम करीत नाही हे तुम्ही दाखवू तर शकत नाहीच, पण विरोधकांनी त्यांच्या राज्यात केलेली कामेही तुम्ही दाखवू नये यासाठी तुमच्यावर दबाव आहे, असेही ते पत्रकारांना म्हणाले.

लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येऊया! – उद्धव ठाकरे

देशात लोकशाहीची हत्या होतेय का असे सध्याचे चित्र आहे. जे लोकशाहीची हत्या करू पाहत आहेत त्यांच्या विरोधातील सर्वच पक्ष आणि जनतेने आता एकत्र होण्याची गरज आहे. लोकशाही वाचवण्यासाठी ही एकजूट महत्त्वाची आहे, आज राजकारणात वाद होत राहतात. परंतु देशाला आणि संविधानाला वाचवायचे आहे. आम्ही सगळे मिळून देशाला गुलाम बनविणाऱ्यांना घरी पाठवणार आहोत, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.