
नागपूर (Nagpur) महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ही माहिती ट्विटरवरून दिली आहे. त्यांनी स्वत: गृहविलगीकरणात जाण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 14 दिवसांत आपल्या संपर्कात ज्या व्यक्ती आल्या असतील त्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी असेही मुंढे यांनी म्हटले आहे. कोरोनाविरूद्धची लढाई आपण पुढचे काही दिवस घरातूनच लढणार असल्याचेही ते म्हणाले आहे. आपण हे युद्ध जिंकणारच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
तुकाराम मुंढे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की “माझा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. मी असिम्पटमॅटीक असून नियम आणि निर्देशानुसार स्वत:ला विलग करण्याचा निर्णय घेतला आहे. माझी सर्वांना विनंती आहे की गेल्या 14 दिवसांत जे माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी. मी नागपुरातील कोरोना महामारीची स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी घरून काम करणार असून आपण नक्की जिंकू “
Dear All, I have tested positive for #COVID19. I am asymptomatic and have isolated myself as per the protocol & guidelines.Request everyone who have come in my contact for last 14 days to get tested.
I am Working from Home to control #pandemic situation in Nagpur.
We shall win— Tukaram Mundhe (@Tukaram_IndIAS) August 25, 2020
नागपुरातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे हे शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. त्यांनी यासाठी वेगवेगळ्या योजना देखील आखलेल्या आहेत. कोरोना रुग्णांवर उपचारांसाठी बेड उपलब्ध व्हावेत, रुग्णांची कोणतीही लुटमार होऊ नये यासाठी तुकाराम मुंढे यांनी विशेष पथकाचं गठनही केलं आहे. नागपुरातील खासगी रुग्णालयांवर महानगरपालिकेचा वॉच राहावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
नागपूरमधील खासगी रुग्णालयांमध्ये पालिकेने ठरवून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी होते की नाही यावर हे विशेष पथक लक्ष ठेवणार आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानं हे विषेश पथक गठन करण्यात आलं आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. महानगर पालिकेचे हे विशेष पथक रुग्णालयांची अचानकपणे पाहणी करणार असून नियमबाह्य गोष्टी दिसल्यास तत्काळ कारवाईचा बडगाही उगारला जाणार आहे.

























































