
शारदीय नवरात्रौत्सवाला रविवारपासून सुरुवात होत आहे. या काळात तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासून ( 13 ऑक्टोबरपासून) तुळजाभवानी मंदिर भाविकासाठी 22 तास खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला आहे. 13 व 14 ऑक्टोबर रोजी भवानी ज्योत घेऊन जाण्यासाठी अगदी परराज्यातूनही भाविक मोठ्या संख्येने येतात. ते लक्षात घेत दर्शनाची वेळ वाढवण्यात आली आहे.
रविवारी घटस्थापना होऊन तुळजाभवानीच्या नवरात्राला सुरुवात होणार आहे. त्यानिमित्त येणाऱ्या भाविकांना देवीचे दर्शन सुलभतेने व्हावे, यासाठी देवीचे चरणतीर्थ रात्री एक वाजता होणार आहे. यानंतर भाविकांना देवीच्या दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे. सिंहासन व पंचामृत अभिषेक पूजा सकाळी 6 ते 10 आणि सायंकाळी 7 ते 9 या वेळेत होणार आहेत. रात्री 10.30 वाजता प्रक्षाळ व शेजारती होऊन रात्री 11 वाजता मंदिर बंद होईल. या नियोजनामुळे भाविकांना आता 22 तास दर्शनासाठी मिळणार आहेत.
विजयादशमीपासून तुळजाभवानीची पाच दिवसीय मंचकी श्रमनिद्रा सुरू होणार आहे. कोजागिरी पोर्णिमेनंतर 29 रोजी देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना झाल्यानंतर अश्विनी पोर्णिमेस सुरुवात होणार आहे. यामुळे नवरात्रासह 28 ते 31 ऑक्टोबर या चार दिवसाच्या कालावधीतही तुळजाभवानी मंदिर भाविकांसाठी पुन्हा 22 तास खुले ठेवण्यात येणार असल्याची माहिती मंदिर संस्थानने दिली आहे.



























































