मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव ओव्हरफ्लो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जोरदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारा आणि पालिका क्षेत्रात असणारा तुळशी तलाव मंगळवारी ओव्हरफ्लो झाला आहे. या तलावात 8046 दशलक्ष लिटर उपयुक्त जलधारण क्षमता आहे. हा तलाव गेल्यावर्षी 12 जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर 2018 मध्ये 9 जुलै रोजी, 2017 मध्ये 14 ऑगस्ट रोजी आणि 2016 मध्ये 19 जुलै रोजी हा तलाव ओव्हरफ्लो झाला होता.

मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या तलावांपैकी तुळशी तलाव सर्वात लहान तलाव असून यातून दररोज सरासरी 18 दशलक्ष लिटर (1.8 कोटी लिटर) एवढ्या पाण्याचा पुरवठा केला जातो. हा तलाव पालिका मुख्यालयापासून साधारणपणे 35 किलोमीटर (सुमारे 22 मैल) अंतरावर आहे. या कृत्रिम तलावाचे बांधकाम 1879 मध्ये पूर्ण झाले आहे. तलावाच्या बांधकामासाठी त्या काळात सुमारे 40 लाख रुपये एवढा खर्च आला होता. या तलावाचे पाणलोट क्षेत्र सुमारे 6.76 किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ सुमारे 1.35 चौरस किलोमीटर एवढे असते.