तुर्कस्थान – 5 हजार भूकंपग्रस्तांच्या मृतदेहांचं दफन, शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्लास्टिकच्या काळ्या बॅगेत बंद झालेल्या मृतदेहांचे ढीग, त्यांच्या अंत्यसंस्कारांसाठी जमलेले नातेवाईक आणि इतर लोक, कडाक्याच्या थंडीत थडग्यासाठी जमीन खोदणारे कर्मचारी… ही दृश्यं आहेत तुर्कस्थानच्या कहरामनमारस शहराची. तुर्कस्थानात भूकंप झाल्यानंतर येथील जनजीवन उद्ध्वस्त झालं आहे. मृतांचा इतका प्रचंड आकडा आहे की, त्यांना दफन करण्यासाठी जंगलाचे काही भाग कापावे लागत आहेत.

आतापर्यंत 5 हजारांची ओळख पटवून त्यांचं दफन करण्यात आलं आहे. अनेक जणांना त्यांचे नातेवाईक अद्याप सापडलेले नाहीत. ते या दफनभूमीवर येऊन आपल्या नातेवाईकांची ओळख पटवायचा प्रयत्न करत आहेत. या शहरातील जमिनदोस्त झालेल्या इमारतीच्या ढिगाऱ्यांना हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यात सापडणाऱ्या मृतदेहांची ओळख पटवून त्यांना दफन करण्याचं काम सुरू आहे.

इतक्या मोठ्या संख्येने असलेले मृतदेह दफन करण्यासाठी दफनभूमीची आवश्यकता असल्याने सरकारने जंगलाच्या काही भाग कापण्याचा निर्णय घेतला आहे. जेसीबीच्या साहाय्याने जंगल साफ करून मातीत खड्डे खणण्याचं काम सुरू आहे. दिवसभरात इथे काही शे मृतदेह येऊन दाखल होत आहेत. जंगलाच्या या भागात आता सामूहिक दफनभूमी तयार करण्यात येणार आहे.

6 फेब्रुवारी रोजी झालेल्या भूकंपात तुर्कस्थान आणि सीरिया येथील सुमारे 34 हजार नागरिकांनी प्राण गमावलेल आहेत. या भूकंपामुळे इमारती जमिनदोस्त झाल्या आहेत. त्यांच्या ढिगाऱ्याखाली चिरडलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. अद्याप बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची चिन्हं आहेत.