>> तुषार प्रीती देशमुख
कुटुंबासाठी स्वयंपाकघराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारणार्या स्त्रीशक्ती घरोघरी आहेत. चारुशीला निरगुडकरही अशाच एक गृहिणी. स्वयंपाकाच्या या आवडीतूनच त्यांचे ‘वारसा चवीचा’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले, प्रत्येक घरातल्या व्यक्तींनी गृहिणीला साथ देऊन वेळोवेळी तिने बनवलेल्या स्वयंपाकाची दाद देऊन तिचा सन्मान केला तर ती नक्कीच वेगळं काहीतरी करू शकते.
आई मंगला कुलकर्णी यांना कामानिमित्त वारंवार बाहेर जावं लागायचं, त्यामुळे सगळ्या स्वयंपाकघराची जबाबदारी आजी राधाबाईंनी स्वीकारली. चारुशीला ताईंना मोकळीक मिळाल्याने लहान वयातच स्वैपाकाचं तंत्र त्या शिकल्या. ज्या गोष्टीत आपल्याला आवड आहे ते काम आपण केले तर त्यात आपण पुढे जाणारच. नेमकं हेच लक्षात ठेवून चारुशीला ताईंनी शिक्षणाबरोबरच स्वयंपाकघरातल्या सगळ्या जबाबदाऱया स्वीकारत सगळे पदार्थ आवडीने शिकून घेतले. त्यांचे लग्न झाले ते देखील एकत्र कुटुंब संस्कृतीत वाढलेल्या, चोखंदळ खवय्या असलेल्या डॉ. सुधीर निरगुडकर यांच्याशी.
सासूबाई लीला निरगुडकर यांनी आपल्या सुनेच्या स्वयंपाकघराशी असलेल्या प्रेमाबद्दलची, पदार्थ बनवण्याची व शिकून घेण्याची आवड ओळखून सुनेला स्वयंपाकघरात आपल्या हाताशी घेतले. लीलाताई बनवत असलेल्या प्रत्येक पदार्थाची चव ही वर्षानुवर्षं तीच असायची. प्रत्येक पदार्थाला असलेली खमंग, चमचमीत फोडणी हे त्याचं वैशिष्टय़ होतं. चारुशीला ताईंची दोन्ही मुलं मंदार व मंजिरी लहानपणापासूनच सर्व भाज्या खायला शिकले होते. मुलांना एखादा पदार्थ बाहेर जाऊन खाण्याची कधी इच्छा झाली नाही याचे कारण त्यांची आई त्यांच्यासाठी प्रत्येक पदार्थ घरी करायची. एखाद्या ठिकाणी गेल्यावर पाणीपुरीच्या पाण्यापासून सँडविचच्या चटणीपर्यंतच्या सगळ्या रेसिपी शिकून त्याचप्रमाणे घरी केल्या जायच्या.
त्यांच्या घरी नेहमीच पाहुण्यांची, नातेवाईकांची रेलचेल असायची. त्यात जेवणाचा बेत ठरलेला. मग चारुताई मेनूपासून जेवणाचे ताट सजवण्यापर्यंत सगळ्याची पूर्वतयारी करायच्या. यात त्यांना त्यांची मुलगी मंजिरी हिची साथ मिळत गेली. मुलं मोठी झाल्यानंतर चारुशीला ताईंनी एक कॅण्टीनदेखील यशस्वीरीत्या चालवले. हे सर्व शिकलेले पदार्थ अनेकांच्या उपयोगी यावे, त्यांनादेखील असे चमचमीत पदार्थ बनवण्यास मदत होईल या हेतूने त्यांनी खाद्यसंस्कृतीवरती एक रेसिपी बुक लिहिण्याचे ठरवले. तेव्हा त्यांची खरी कसरत होती. कारण घरी बनवला जाणारा पदार्थ हा हाताच्या मापाने बनवला जायचा; पण आता तो योग्य मापात बनवता आला पाहिजे यासाठी एका पदार्थ चार ते पाच वेळा करून तो योग्य मापात त्यांनी बनवून त्याचे योग्य प्रमाण लिहून काढले, या संपूर्ण प्रवासात डॉ. निरगुडकर यांची त्यांना मोलाची साथ लाभली. याचे कारण, तो पदार्थ कसा झाला याचे ते योग्य क्रिटिक बनले व त्यामुळेच चारुशीला ताई म्हणतात, मला माझ्या नवऱयाच्या याच चोखंदळ खवय्येगिरीमुळे हे करणे शक्य झाले.
चारुशीला ताईंचे ‘वारसा चवीचा’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले, ज्यात अनेक वेगवेगळ्या पदार्थांचा सहभाग आहे. आईच्या याच सर्व कलागुणांना समाविष्ट करून त्यांची मुलगी मंजिरी हिने आपली मुलगी मीरा हिलादेखील लहान वयात एकही बाहेरचा पदार्थ खाऊ घातला नाही. तर आपल्या घरातल्या निरगुडकर फार्म्समध्ये पिकलेल्या सकस भाज्या, मसाले, तांदूळ खाऊ घातले व लहान वयातच आपल्या मुलीला सकस खाद्यपरंपरेची ओढ निर्माण करून दिली. मंजिरी व तिचा भाऊ मंदार आज निरगुडकर फार्म्स या त्यांच्या स्वतच्या शेती उत्पादनामधून अनेक सकस पदार्थ बनवतात. या त्यांच्या व्यवसायात मंजिरीला साथ लाभली ती तिच्या सासरची. तिचे पती अखिल राव तिच्या प्रत्येक निर्णयाला प्रोत्साहन देतात. निरगुडकर व राव या कुटुंबातल्या खाद्यसंस्कृतींची वेगळी परंपरा असूनही तिच्या सासूबाई अमृता राव यांनी तिला तितकीच मोकळीक दिली आहे. मंजिरीने अनेक वर्षे नोकरी करून स्वतचा व्यवसाय करण्याचे ठरवले, ज्यात तिला तिच्या भावाची मंदारची साथ लाभली.
असा हा आजीपासून आईकडे आलेला व आईकडून मुलीकडे चालत असलेला खाद्यसंस्कृतीचा वसा सुख व आनंद देणारा आहे. चारुशीला ताईंच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो जेव्हा त्यांच्यासाठी डॉ. निरगुडकर स्वत मूगडाळीची खिचडी बनवतात. त्यांनी बनवलेली खिचडी सगळ्यांची आवडती असल्यामुळे अनेकदा ते काम त्यांच्याकडे असते, जे ते प्रेमाने व आनंदाने स्वीकारून सगळ्यांना खाऊ घालत असतात.
चारुशीला ताई म्हणतात, कोणताही पदार्थ बनवताना तो प्रेमाने बनवला तर त्याची चव आणखी रुचकर लागते. प्रत्येक घरातल्या व्यक्तींनी स्वयंपाकघरात स्वयंपाक करणाऱया गृहिणीला साथ देऊन वेळोवेळी तिने बनवलेल्या स्वयंपाकाची दाद देऊन तिचा सन्मान केला पाहिजे. एक गृहिणी काय करू शकते? तर, आपल्या कुटुंबासाठी सकस आहार तयार करून, असंख्य वेगवेगळे पदार्थ स्वत शिकून ते पदार्थ त्यांना खाऊ घालत स्वतचे अस्तित्व निर्माण करू शकते. त्यासाठी लागणारी मेहनत, जिद्द ही फक्त तिला न हारता, न खचता घ्यावीच लागते.
‘हीच ती खरी स्त्री शक्ती’ अश्या या चारुशीलाताईंसारख्या ज्यांनी आपल्या कुटुंबासाठी आपल्या स्वयंपाकघराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून आपल्या स्वप्नांची पूर्तता केली अश्या अनेक स्त्री शक्तींना शतश नमन!