तुम्हाला ऐकावेच लागेल! गृहमंत्री अमित शहांनी ओवेसींना खडसावले

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्दय़ावरून सोमवारी लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) मजबूत बनविणाऱ्या सुधारणा विधेयकावरील चर्चेदरम्यान सत्यपाल सिंह यांच्या भाषणात ओवेसी यांनी वारंवार अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. त्यावर गृहमंत्री शहा यांनी तुम्हाला ऐकावेच लागेल, अशा शब्दांत ओवेसींना खडसावले.

एनआयए सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले. यावेळी  सभागृहात झालेल्या चर्चेदरम्यान भाजप खासदार सत्यपाल सिंह मुंबईने दहशतवादाला खूप सहन केले आहे. कारण मुंबईत नेहमीच राजकीय चष्म्यातून दहशतवाद पाहिला गेला, असे म्हणाले. हैदराबाद बॉम्बस्फोटप्रकरणी पोलिसांनी काही संशयित अल्पसंख्याक समुदायाच्या नागरिकांना ताब्यात घेतले. त्यावेळी राज्यातील एका नेत्याने हैदराबादच्या पोलीसप्रमुखांना तपासाची दिशा बदलण्यास सांगितले होते. जर असे केले नाही तर बदली करण्याची धमकी दिली होती असा आरोपही त्यांनी केला. त्यास हैदराबादचे खासदार असदुद्दीने ओवेसी यांनी आक्षेप घेत पुरावे सादर करण्याची मागणी केली.

त्यावर अमित शहा यांनी दुसऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी विरोधी सदस्यांनी संयम बाळगला पाहिजे. आता तुम्हाला ऐकावेच लागेल, असे खडे बोल सुनावत ओवेसींना खाली बसण्यास भाग पाडले. शहा आणि ओवेसी यांच्यात या दरम्यान शाब्दिक संघर्ष झाल्याने सभागृहात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.

शहा-ओवेसी यांच्यात शाब्दिक संघर्ष

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांच्या भाषणात अडथळे निर्माण करणाऱया ओवेसींना गृहमंत्री अमित शहा यांनी रोखले. यामुळे संतप्त झालेल्या ओवेसी यांनी ‘ऊंगली मत दिखाइए, मै डरुंगा नही’ असे सांगितले. त्यावर शहा यांनी ‘मी कोणाला घाबरवत नाहीय पण कोणाच्या मनात भीती असेल तर मी काही करू शकत नाही’ असे त्यांना ठणकावले.

‘एनआयए’ आता सायबर गुह्यांचीही चौकशी करणार, सुधारणा विधेयक मंजूर

मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यानंतर स्थापन केलेली राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आता सायबर गुन्हे, मानवी तस्करी आदी गुह्यांचाही तपास करू शकणार आहे. यासंदर्भातील राष्ट्रीय तपास यंत्रणा (सुधारणा) विधेयकाला सोमवारी लोकसभेत मंजुरी देण्यात आली. या विधेयकानुसार एनआयएला हिंदुस्थानी तसेच परदेशातील हिंदुस्थानींच्या संरक्षणार्थ दहशतवादी कारवायांचा तपास करता येणार आहे.

 ‘एनआयए’चा वापर फक्त आणि फक्त देशातील दहशवाद संपविण्यासाठीच सरकार करणार असल्याची निसंदिग्ध ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेला दिली. एनआयएचा दुरुपयोग आमचे सरकार कदापि करणार नाही. मात्र, जे देशाच्या मुळावर उठतील त्यांना जरब बसविण्याचा आम्ही प्रयत्न करू. वाजपेयी सरकारने आणलेला ‘पोटा’ सारखा कडक कायदा यूपीए सरकारने केवळ व्होटबॅंकेवर डोळा ठेवून रद्द केला. हा कायदा रद्द करणे ही मोठी घोडचूक होती. हा कायदा रद्द झाल्यानंतरच मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला, असे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या