कोकण रेल्वेची ‘तुतारी’ वेळेवर वाजेना; वेळापत्रक कोलमडले

मुंबई-दादरहून सुटणारी 1103 तुतारी एक्स्प्रेसची तुतारी वेळेवर वाजत नसल्याचे चित्र आहे. ही गाडी कधी 17 मिनिटे आधी तर कधी 23 मिनिटे उशिराने सावंतवाडी येथे पोहोचत आहे. तर अनेकदा ही गाडी निर्धारित वेळेच्या 17 मिनिटे आधीही पोहोचत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रवाशांच्याही वेळेचे गणित बिघडले असून या त्रासाबद्दल प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

14 जुलै रोजी तुतारी एक्स्प्रेस 25 मिनिटे आधी म्हणजेच 12 वाजून 25 मिनिटांनी पोहोचली. 13 जुलै रोजी 17 मिनिटे आधी, 12 जुलै रोजी 6 मिनिटे अगोदर, 11 आणि 10 जुलै रोजी प्रत्येकी 1 मिनिटे उशिराने तुतारी एक्स्प्रेस सावंतवाडी येथे पोहोचली. 9 जुलै रोजी ही गाडी 4 मिनिटे आधी, 7 जुलै रोजी 2 मिनिटे आधी पोहोचली. सर्वाधिक विलंब 8 जुलै रोजी नोंदवला गेला. त्या दिवशी गाडी 23 मिनिटे उशिरा आली. विशेष म्हणजे कुडाळ ते सावंतवाडी हे केवळ 20 किलोमीटरचे अंतर असून सामान्य गाड्या हे अंतर 20 मिनिटांत पूर्ण करतात. परंतु तुतारी एक्स्प्रेसला हेच अंतर पार करण्यासाठी तब्बल 56 मिनिटे लागतात. रेल्वे प्रशासनाने या मार्गावर 36 मिनिटांचा स्लॅक टाइम दिल्याने प्रवाशांना अधिक वेळ प्रतीक्षा करावी लागत आहे. या वेळेच्या फरकाकडे रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने पहावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.